नागपूर : नाग नदीतील पाणी स्वच्छ राहावे, यासाठी केंद्र शासनाने नागनदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला यापूर्वीच मंजुरी दिली होती. नागपूर शहरासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी हा प्रकल्प आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहराच्या सौंदर्यीकरणात विलक्षण भर पडणार आहे.
यापार्श्वभूमीवर नाग नदी प्रदूषण निवारण प्रकल्पासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराच्या नियुक्तीसाठी दोन कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे.
सुमारे 2000 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचा उद्देश नाल्यात बदललेल्या नाग नदीचे स्वच्छ आणि पुनरुज्जीवन करणे हा आहे. निविदा सादर केलेल्या दोन कंपन्यांपैकी टाटा कन्सल्टिंग इंजिनिअरिंग लिमिटेडचा दावा अधिक मजबूत आहे. महापालिकेच्या तांत्रिक मूल्यमापन समितीच्या मार्किंगमध्ये टाटा कन्सल्टिंगला जास्त गुण मिळाल्याची माहिती आहे.
प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यासाठी नागपूर महापालिकेने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यासाठी निविदा काढली होती. यामध्ये टाटा कन्सल्टिंग इंजिनिअरिंग लिमिटेड आणि गुडगावची कंपनी स्मेक इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्यांनी निविदा भरल्या आहेत. महापालिका आयुक्त म्हणाले की, सध्या ज्या कंपन्यांनी राष्ट्रीय नदी संवर्धन मंडळाकडे पाठवले जाणार आहे, त्या प्रस्तावांचे आर्थिक मूल्यमापन महापालिकेने केले. समितीने टाटाला 93.77 टक्के तर स्मेकला 78.69 टक्के गुण दिले आहेत. टाटाने प्रकल्पासाठी 87 कोटी 12 लाख रुपयांची मागणी केली आहे.स्मेकने 104 कोटींहून अधिक किमतीची निविदा भरल्याची माहिती आहे.