मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी ७ वाजतापासून सुरूवात झाली आहे. एकीकडे निवडणुकांची धामधूम सुरु असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला. एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये येताना आपल्यासोबत पैशांनी भरलेल्या बॅगा आणल्याचे राऊत म्हणाले. यासंदर्भातला एक व्हिडीओही राऊत यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, नाशिकमध्ये रात्रीस खेळ चाले. नुसता पै पाऊस… दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा पोलिस का वाहत आहेत? यातून कोणता माल नाशिकला पोहचला? निवडणूक आयोग फालतू नाकाबंदी आणि झडत्या करत आहे. महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप सुरु आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.
राऊत यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर केलेल्या या आरोपाला आता सत्ताधारी नेते काय प्रत्युत्तर देणार, हे पाहावे लागेल, असे राऊत पोस्टमध्ये म्हणाले आहेत. मुख्यमंत्री शिंदे तब्बल १२ ते १३ कोटी रुपये या बॅगांमध्ये भरून नाशिकमध्ये उतरले.
तिथून त्यांनी ते पैसे एका हॉटेलात नेले. हॉटेलमध्ये बसून त्यांनी ते पैसे कोणाला दिले, त्यांनी ते पैसे कुठे नेले याबाबतची माहिती मी लवकरच सर्वांसमोर मांडेन, असेही राऊत म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान चालू आहे. दरम्यान, मतदानाच्या आदल्या दिवशी महायुतीच्या नेत्यांनी, उमेदवारांनी वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये मतदारांना पैसे वाटल्याचे आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.