नागपूर :अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ३०० कोटींच्या संपत्तीसाठी ‘सुपारी कीलिंग’ची घटना समोर आली आहे.आरोपीने ८२ वर्षाच्या वृद्धाला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.गुन्हेशाखा पोलिसांनी कारचालकासह दोघांना अटक केली आहे. पुरुषोत्तम पुट्टेवार (वय ८२, रा. बालाजीनगर) असे मृतकाचे नाव आहे.तर नीरज निमजे (वय ३२) व सचिन धार्मिक (वय ३०) अशी अटकेतील आरोपींची नावे असून, यातील सार्थक बागडे हा फरार आहे या घटनेत मृतकाच्या जवळच्या व्यक्तीने ही सुपारी दिल्याची माहिती समोर आली आहे.
माहितीनुसार, पुरुषोत्तम यांचा मोठा मुलगा हेमंत हे चंद्रपूर येथे असतात. तर त्यांचा लहान मुलगा डॉ. मनीष (वय ५४, रा. शुभनगर, मानेवाडा रोड) हे अॅलेक्सिस हॉस्पिटलमध्ये कान, नाक, घसा तज्ज्ञ आहेत. त्यांचे घरीच शुभम क्लिनिक आहे.गेल्या ८ मे रोजी शकुंतला यांच्यावर हिप रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया झाली. सुटी झाल्यानंतर मनीष यांनी शकुंतला यांना घरी आणले. क्लिनिकमधील एका खोलीत त्यांना ठेवले. पुरुषोत्तमही तेथेचे राहायचे.
सकाळी आंघोळीला ते मुलीकडे जायचे. २२ मे रोजी बालाजीनगरमधील दीनदयाल ग्रंथालयाजवळून पायी जाताना अज्ञात कारने त्यांना चिरडले. अपघातानंतर चालक कारसह फरार झाला आहे. याप्रकरणी आगोदर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे सचिनला अटक केली. दोन दिवसांपूर्वी पुरुषोत्तम यांच्या नातेवाइकांनी हा अपघात नसून घातपात असल्याची तक्रार पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्याकडे केली. सिंगल यांनी गुन्हेशाखेला तपासाचे आदेश दिले. पोलिसांनी सचिन व त्याच्या माहितीवरून नीरजला अटक केली. सार्थक बागडे याच्या सांगण्यावरून खून केल्याचे दोघांनी सांगितले.
सार्थक फरार आहे. सार्थकबाबत माहिती काढली असता तो मनीष यांचा चालक असल्याचे समोर आल्याने पोलिसांना मोठा धक्का बसला. चालकाच्या अटकेनंतर सुपारी देणाऱ्याचे नाव समोर येईल. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून आताच याप्रकरणी कोणती माहिती देता येणार नसल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणाले.