नागपूर : शहरातील कामठी परिसरात राहणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराची १३ वर्षीय मुलगी गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुलीच्या पोटात दुखत असल्याने तिला डॉक्टरांकडे नेले असता ती गर्भवती असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलीला विचारले असता तिने काहीही सांगण्यास नकार दिला आहे. नवीन कामठी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.
माहितीनुसार, पीडित मुलीच्या पोटात दुखत असल्याचे तिने आपल्या आजीला सांगितले. आजीने तिला डॉक्टरांकडे नेले असता ती गर्भवती असल्याचे माहिती झाले. मात्र आजीला यावर विश्वास बसला नाही. ३ जूनला मुलीने पोट दुखत असल्याचे आईला सांगितले.
आईने जरीपटक्यातील एका डॉक्टरकडे नेले असता तिला सोनोग्राफी करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. डॉक्टरांनी सोनोग्राफी केल्यानंतर अहवालात मुलगी ६ महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आल्याने आईला मोठा धक्का बसला. डॉक्टरांनी मुलीचे वय लक्षात घेता पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देण्याचा सल्ला दिला. या प्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. मात्र पीडित मुलगी यासंदर्भात काहीच सांगण्यास तयार नाही. तसेच तिच्या आईनेही याबाबत तक्रार देण्यास नकार दिला.
पोलिसांनी काही संशयितांची डीएनए टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. त्या मुलीवर कुणीतरी नातेवाईक मुलानेच बलात्कार केल्याची संशय वर्तविण्यात येत असून याप्रकरणी जुन्या कामठी पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी तपास सुरु केला आहे.