नागपूर: नागपूर मध्यवर्ती कारागृहात पुन्हा एकदा शिक्षा भोगत असलेल्या दोन टोळ्यांमध्ये ‘गँगवार’ घडल्याने खळबळ उडाली.दोन्ही टोळ्यांमधील एकूण ८ जण जखमी झाल्याची माहिती आहे. एका गुन्हेगाराच्या प्रेयसीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने हा वाद पेटल्याचे समोर आले.या घटनेमुळे कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
माहितीनुसार, नरसाळा येथील सूरज गंगाधर कार्लेवार आणि पाचपावलीतील साकीब अन्सारी हे दोन नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात कैद आहेत.दोघांवर खुनाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांचे साथीदारही त्यांच्यासोबत शिक्षा भोगत आहेत. वृषभ कावळे नावाचा गुन्हेगारही चोरीच्या गुन्ह्यात कारागृहात आहे.
सर्वांना बडीगोलच्या बॅरेक क्रमांक दोनमध्ये ठेवण्यात आले आहे. रविवारी रात्री साकिब अन्सारी आणि वृषभ कावळे यांनी सूरज कार्लेवारच्या ग्रुपमधील लोकेशच्या प्रेयसीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. सूरज संतापला. त्याने त्यांना फटकारले व धमकी दिली. मंगळवारी सकाळी ८ वाजता साकिब, वृषभ आणि त्यांच्या मित्रांनी या रागातून सूरजवर धारदार टिनपत्र्याने वार केले. यात त्याच्या हाताला जखम झाली. हे पाहून सूरजचे मित्र धावून आले.
त्यांनी साकिबच्या मित्रांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. बॅरेकमध्ये लावण्यात आलेले टीव्ही संच आणि इतर साहित्यांची तोडफोडही या मारहाणीदरम्यान झाली. रक्षा कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती अधिकाऱ्यांना दिली. सुरुवातीला सर्वांनी या घटनेसंदर्भात वाच्यता केली नाही.मात्र पोलिसांनी कठोरपणे सर्व गोष्टींचा उलघडा केला. या प्रकरणी धंतोली पोलिसांना तपास सुरु केला आहे.