नागपूर : नागपूरच्या सोनेगाव पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या मनीष लेआऊटमधील स्वावलंबी नगरमध्ये घराच्या व्हरांड्यात असलेल्या विहिरीत बुडून दीड वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.रुद्रांश डोनारकर असे मृत मुलाचे नाव आहे.
माहितीनुसार, आशिष डोनारकर हा स्वावलंबी नगर येथील हनुमान मंदिराजवळ राहतो. तो एका खासगी कंपनीत काम करतो.घटनेच्या दिवशी दुपारी आशिष कामावर गेला होता, तर त्याची पत्नी घरात कामात व्यस्त होती. त्याचवेळी दीड वर्षाचा रुद्रांश घरात खेळत होता.
घराच्या खालच्या भागात व्हरांडा आहे. व्हरांड्याच्या एका कोपऱ्यात एक विहीर आहे. खेळता खेळता रुद्रांश विहिरीजवळ पोहोचला. याच दरम्यान त्याने विहिरीत अगोदर चप्पल टाकली.
कुतूहलाने त्याने जवळच असलेल्या विहिरीतून खाली डोकावले असता तोल गेल्याने तो विहिरीत पडला. मुलगा दिसत नसल्याने काही वेळाने आईने त्याला शोधण्यास सुरुवात केली. विहिरीजवळ पाहिले असता रुद्रांशचा मृतदेह तिला विहिरीत तरंगताना दिसला. या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली.पोलिसांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढला असून आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास करत आहेत.