नागपूर : शहरात अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. कपिलनगर येथील कामगार नगर चौकात 16 चाकी टिप्परने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला, तर वाठोडा येथे एका पादचाऱ्याचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.
पहिल्या अपघाताच्या घटनेत, भावेश रवींद्र भरणे (27, रा. फ्लॅट क्रमांक 606, विदर्भ कॉम्प्लेक्स, संगम टॉकीजजवळ) कपिलनगर पोलीस ठाण्यांतर्गत कामगार नगर चौकातून जात असताना बेदरकारपणे 16 चाकी टिप्परने (MH/40/CT) धडक दिली.
भावेशला तातडीने मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कपिलनगर पोलिसांनी याप्रकरणी आरोपी ट्रक चालक राधेश्याम हिरालाल रहांगडाले (53, रा. कांद्री, कन्हान) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
तर दुसरी घटना वाठोडा पोलीस स्टेशन अंतर्गत घडली. २9 वर्षीय प्रकाश अशोक महंत यांचा रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाला. माहितीनुसार,प्रकाश यांनी जबलपूर-हैदराबाद महामार्गावर आपले वाहन उभे केले होते. यादरम्यान रस्ता ओलांडत असताना दुपारी ४ वाजताच्या सुमारास त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली, परिणामी त्यांचा मृत्यू झाला. दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी बीएनएसच्या कलम १०६(१) आणि २८१ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास सुरू केला आहे.