नागपूर : शहरातील सुरेंद्रगढ परिसरात असलेल्या महानगर पालिकेच्या शाळांची अवस्था वाईट आहे. काँग्रेसचे शहर प्रवक्ते अभिजीत झा यांच्यासह ‘नागपूर टुडे’च्या टीमने सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक आणि प्राथमिक शाळेला भेट दिली.
शाळेच्या नूतनीकरणाची ऑर्डर ऑगस्ट 2022 पासून आहे. त्यानुसार काम एप्रिल 2024 मध्ये पूर्ण व्हायला हवे होते.मात्र अद्यापही शाळेचे बांधकाम पूर्ण झालेले नाही. जितकेही काम याठिकाणी झाले त्यात निकृष्टता आढळून आली आहे.
तसेच येत्या दोन महिन्यातही या शाळेचे बांधकाम पूर्ण होऊ शकत नाही. शाळेच्या बांधकामासाठी जवळपास दीड कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. मात्र याठिकाणी बांधकाम सुरळीत सुरु आहे की नाही हे पाहण्यासाठी कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याला वेळ नाही.
नागपूर महानगर पालिकेने शिक्षण क्षेत्रात सुरु असलेला भ्रष्टाचार आणि कमिशनचा खेळ बंद करणे गरजेचे आहे. कारण शालेय विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा हा प्रश्न असल्याचे अभिजीत झा म्हणाले आहेत. पूर्वी या शाळेत ५०० च्या वर विद्यार्थी होते.मात्र आता विद्यार्थ्यांची पटसंख्येत घट होऊन ३५० वर आली आहे. हे पाहता नागपूर महानगर पालिकेच्या शाळा नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचेही ते म्हणाले.