नागपूर: मुंबई -नागपूर समृध्दी महामार्गाच्या बांधकामासाठी 55 हजार कोटी रुपयांचा खर्च होऊनही मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. महामार्गावर निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे उघडकीस आहे.
वर्षभरातच महामार्गावर ठिकठिकणी भेगा पडल्या. एकीकडे ‘मृत्यूचा महामार्ग’ अशी प्रतिमा निर्माण झालेल्या समृद्धी महामार्गातून फक्त सत्ताधाऱ्यांचीच समृद्धी झाली आहे,असा शब्दात पटोले यांनी सरकारला धारेवर धरले.
समृद्धी महामार्गात झालेल्या भ्रष्टाचारामुळेच रस्त्याला भेगा पडल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच या महामार्गाचे उद्घाटन करण्यात आले होते.
समृद्धी महामार्गाप्रमाणेच मुंबई-नवी मुंबईला जोडणाऱ्या १८ हजार कोटी रुपयांच्या ‘अटल सेतू’लाही भेगा पडल्याचे नुकतेच उघड झाले होते. समृद्धीला भेगा, अटल सेतूला भेगा यातून मोदींची गॅरंटी किती तकलादू आहे हे स्पष्ट झाले. राज्य सरकारच्या भ्रष्टाचाराचे धिंडवडे निघत असल्याचा घणाघात पटोले यांनी केला.