नागपूर: नागपूर महापालिकेवर प्रशासकीय राजवट असून शहराची सर्व जबाबदारी महापालिका आयुक्तांवर आहे. मात्र मनपा प्रशासनाच्या कारभारामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांनी महापालिका कार्यालयाबाहेर निदर्शने करत महापालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
अनेक परिसरात पाणी टंचाई रस्त्यांची दुरवस्था, रस्त्यांवरील खड्डे, रहिवासी भागातील कचऱ्याचे साम्राज्य, दुर्गंधीसारख्या समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आमदार विकास ठाकरेंच्या नेतृत्त्वात काँग्रेसने महापालिका कार्यालयाबाहेर आंदोलन केले.
यामुळे काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले. आंदोलकांनी महापालिका आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी यांची भेट घेण्यासाठी कार्यालयात जाण्याचाही प्रयत्न केला. मात्र सुरक्षा रक्षकांनी त्यांना थांवबिले.
दरम्यान आमदार अभिजीत वंजारी आणि आमदार विकास ठाकरे यांनी महापालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत सरकारवर निशाणा साधला. पावसाळ्यातील वाढत्या समस्यांमुळे आता महापालिका प्रशासनाविरोधात जनतेच्या मनात संतापाची लाट असल्याचे ठाकरे म्हणाले.