नागपूर : वाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत नोकराने मालकाची ४३.५३ लाखांनी फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नोकराने मालकाचा विश्वासघात करत रजिस्टरमध्ये बनावट नोंदी करत ४३.५३ लाख रुपये परस्पर दुसरीकडे वळवत फसवणूक केल्याचे समोर आले. मुरलीधर मालचंद आसोपा (३८, बिकानेर, राजस्थान) असे फसवणूक करणाऱ्या आरोपी नौकराने नाव आहे.
माहितीनुसार मनोज मोहनलाल शवकानि (४८, आंबेडकरनगर, अमरावती मार्ग) यांची बालाजी गोल्डन ट्रान्सपोर्ट कंपनी आहे.
त्यांच्याकडे मुरलीधर काम करतो. मनोजने मुरलीधरवर बॅंक खात्याचे सर्व व्यवहार तसेच हिशेबाची कामे सोपविली होती. २५ मे ते २६ जून या कालावधीत मुरलीधरने कंपनीच्या रजिस्टरमध्ये बनावट नोंदी केल्या. त्यानंतर त्याने स्वत:च्या तसेच नातेवाईकांच्या खात्यावर ४३.५४ लाख रुपये वळते केले.
ही बाब समोर आल्यावर मनोज यांनी त्याला पैसे परत मागितले. मुरलीधरने पैसे तर दिलेच नाही, वरून मनोज यांनाच जीवे मारण्याची धमकी दिली. मनोज यांच्या तक्रारीवरून वाडी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यासाठी पुढील तपास सुरु केला आहे.