नागपूर: उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दुचाकी वाहनचालकांसाठी व्ही.एन.आय.टी. च्या परिसरातून जाणाऱ्या रस्त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
उत्तर अंबाझरी ते दक्षिण अंबाझरी मार्गावर सकाळी 9.30 ते 11.00 आणि सायंकाळी 5.00 ते 7.00 पर्यंत हा मार्ग नागरिकांसाठी खुला ठेवण्यात आला आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी शुक्रवारी (19 जुलै) या रस्त्याची पाहणी केली.
हा मार्ग दुचाकी वाहनांना व रुग्णवाहिकांना एका बाजूने वाहतुकीसाठी खुला केला आहे. दक्षिण अंबाझरी मार्गावरुन या मार्गाने वाहनचालकांना उत्तर अंबाझरी मार्गावर यशवंत नगर टी-पाईंट पर्यंत जाता येत आहे. मनपातर्फे व्हीएनआयटी परिसराची संरक्षण भिंत पाडून 70 मीटर लांबीचा रस्ता तयार करण्यात आला आहे. याठिकाणी आत जाण्यासाठी फुटपाथवर रॅम्प तयार करण्यात आला आहे.
तसेच रस्त्यावर अतिरिक्त पथदिवे लावण्यात आले आहे. आयुक्तांनी रस्त्यांवर पाणी साचू नये यासाठी उपाय करण्याचे निर्देश दिले. आयुक्तांनी अभ्यंकर नगर चौक ते एल.ए.डी. कॉलेज चौक पर्यंत रस्त्याची पाहणी केली आणि रस्त्यावर पडलेले खड्डे तात्काळ बुजविण्याचे आदेश दिले.