नवी दिल्ली : देशात मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पहिला अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पातून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना मोठे गिफ्ट मिळाले आहे. बिहार आणि आंध्रप्रदेशसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे.
आंध्रप्रदेशला अतिरिक्त 15 हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आंध्र प्रदेशमधील पोलावरम सिंचन योजना पूर्ण करण्याची ग्वाहीही अर्थसंकल्पातून चंद्राबाबूंना देण्यात आली आहे.
बिहारमध्ये एक्सप्रेस वे बनवण्याची घोषणा करण्यात आली आहे.बिहारमध्ये रस्ते बांधणीवर भर दिला जाणार असून पटना-पूर्णिया एक्सप्रेसवे, बक्सर-भागलपूर राजमार्ग, बुद्धगया-राजगीर-वैशाली-दरभंगा आणि बक्सरमध्ये गंगा नदीवर पूल बांधण्यासाठी 26 हजार कोटी रुपये दिले जाण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. तसेच बिहारमध्ये मेडिकल कॉलेज स्थापन करण्यात येणार असल्याची देखील घोषणा करण्यात आली आहे.
सुमारे 21 हजार 400 कोटी रुपये खर्चून बिहारमध्ये ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. यामध्ये पिरपेंटी येथे 2400 मेगावॉटचा नवीन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. नवीन विमानतळ, वैद्यकीय महाविद्यालयांसाठीही विशेष तरतूद अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे.