नागपूर :आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहे. यापार्श्वभूमीवर भाजपने उपक्रमांचा धडाका लावला आहे. नागपुरात सिद्धिविनायक फाऊंडेशनने फिरते दवाखाना सुरू केल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. तसेच प्रसार माध्यमांशी बोलतांना त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
काँग्रेससारखा नौटंकी पक्ष मी पाहिला नाही. तुम्ही काही चांगलं केलंत, तर तुम्ही असं का केलंत? सरकार खोटे बोलत आहेत, अशी टीका ते सातत्याने करीत असतात. राज्य सरकारने जाहीर केलेल्या योजनांवर विरोधकांनी निशाणा साधला. मात्र लाडली बहना योजनेबाबतचा त्यांचा खोटारडेपणा काही चालणार नाही हे त्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे काँग्रेस चिंतेत आहे.
काँग्रेस पक्ष हा रडणारा पक्ष झाला आहे, ते अजितदादा, शिंदे साहेब आणि फडणवीस यांना घाबरतात, असा घणाघात बावनकुळे यांनी केला.
दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरराव फडणवीस यांच्या स्मरणार्थ याची सुरुवात करण्यात आली आहे.हा फिरता दवाखाना आधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे.
हे क्लिनिक घरोघरी जाणार असून, एकही रुग्ण आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाही, अशी माहितीही बावनकुळे यांनी दिली.