नागपूर : दीक्षाभूमीवरील भूमिगत पार्किंगच्या विरोधात आंबेडकर अनुयायांनी आंदोलक करत बांधकामाची तोडफोड केली होती. जनतेचा आक्रमक पवित्रा पाहता भूमिगत पार्किंगचे बांधकाम थांबविण्यात आले. दीक्षाभूमीवरील भूमिगत पार्किंगसाठी खोदण्यात आलेला खड्डा हा २० सप्टेंबरपर्यंत बुजविण्यात येईल, असे आश्वासन एनएमआरडीएचे आयुक्त सजय मीना यांनी विविध आंबेडकरी संघटनांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना दिले.
दीक्षाभूमी वरील भूमिगत पार्किंगसाठी करण्यात आलेले खोदकाम तसेच पडून आहे. २५ दिवस लोटले तरी खड्डा बुजवण्यात आलेला नाही. त्यामुळे खड्ड्यात पाणी साचले आहे. हे साचलेले पाणी मुख्य स्मारकासाठी धोकादायक ठरू शकते, अशी शक्यता आहे. त्यामुळे हा खड्डा तातडीने बुजवण्यात यावा, अशी मागणी आंबेडकर संघटनांनी केली होती.
यासंदर्भात भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, वंचित बहुजन आघाडी, मुक्तिवाहिनी, रिपब्लिकन मुव्हमेंट आदींसह ४० विविध संघटनांचे प्रतिनिधींच्या एका शिष्टमंडळाने गुरूवारी एनएमआरडीएचे आयुक्त संजय मीणा यांची भेट घेऊन याविषयावर सविस्तर चर्चा केली तसेच त्यांना निवेदन सादर केले. काही तांत्रिक बाबीमुळे खड्डा बुजवण्याच्या कामाला सुरूवात झाली नसली तरी २० सप्टेंबरपर्यंत खड्डा बुजवण्यात येईल, असे आश्वासन एनएमआरडीएतर्फे देण्यात आले.