नागपूर: “लव्ह ट्रायंगल” प्रकरणातून पारडीच्या भांडेवाडी परिसरात एका महिलेसह ४ आरोपींनी तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शनिवारी उपचारादरम्यान त्या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणातील सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्यांच्याविरोधात खुनासह गुन्हेगारी कट रचल्याच्या कलमातही वाढ करण्यात आली.
निशांत प्रदीप तांबडे (रा. झेंडा चौक, महाल) असे मृताचे नाव आहे. तर ममता चव्हाण, अभिषेक युवराज वेलेकर, राजू ध्रुव चक्रधारी आणि तारिक युनूस शहा सर्व रा. भांडेवाडी, अशी आरोपींची नावे आहेत.
माहितीनुसार, २० जुलै रोजी अभिषेक, राजू आणि तारिक निशांतच्या घरी आले. सर्वांनी सोबत बसून दारू ढोसली. दारूच्या नशेत अभिषेकने त्याचे ममताशी प्रेमसंबंध असल्याचे निशांतला सांगितले. निशांतनेही त्याचे ममताशी प्रेमसंबंध असून दोघेही लग्न करणार असल्याचे सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की अभिषेकने ममताच्या घरी जाऊन तिला यासंदर्भात विचारणा केली. सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास दोघेही ममताच्या घरी पोहोचले.
ममताने ती अभिषेकशी लग्न करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे निशांतला राग अनावर झाला. दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. अभिषेक आणि त्याच्या साथीदारांनी निशांतला मारहाण सुरू केली. त्याच्यावर चाकूने वार केले.
जीव वाचवण्यासाठी निशांत पळाला . मात्र पारडी चौकात आरोपींनी त्याला घेरले तसेच चाकूने सपासप वर केले. यादरम्यान एका पोलिसाने मध्यस्थी करून निशांतला आरोपींच्या तावडीतून सोडवले आणि मेडिकल रुग्णालयात दाखल केले असताना डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.