नागपूर : मध्य प्रदेशातील जुन्नरदेव परिसरात रविवारी दुपारी कट्टा नदीच्या जोरदार प्रवाहात पाच नागपूरकर तरुणांची कार पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.कारमधील चार तरुण पोहून सुरक्षित बाहेर पडले. मात्र एक तरुण वाहनासह वाहून गेल्याने सायंकाळी उशिरापर्यंत त्याचा शोध लागलेला नाही.
माहितीनुसार, कार कट्टा नदीवरील पूल ओलांडत असताना जोरदार प्रवाहात अडकली. पुराच्या पाण्याने हा पूल वाहून गेल्याची माहिती आहे.
धोकादायक परिस्थिती असूनही चालकाने पुढे जाण्याचा प्रयत्न केला. गाडी पुलाच्या मधोमध येताच नदीच्या प्रवाहाबरोबर वाहून जाऊ लागली.
चार तरुण वाहनातून पळून जाण्यात आणि पोहून सुरक्षित बाहेर पडण्यास यशस्वी झाले. तर शैलेश कुशवाह नावाचा एक तरुण गाडीसह वाहून गेला. सेल्स मॅन असलेला कुशवाह बेपत्ता आहे.
मिलिंद पराते, केतन डेकाटे, विक्रम आटाव आणि निखिल सोमकुवार अशी कारमधील इतर प्रवाशांची नावे आहेत. आपत्कालीन सेवा आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी बचावकार्य सुरू केले आहे. गोताखोरांनी पूरग्रस्त कट्टा नदीत बेपत्ता तरुण आणि कार या दोघांची शोध मोहीम राबवली. मात्र अद्यापही त्यांचा शोध लागलेला नाही.