सांगली
: आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाली आहे.विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार तथा महायुतीचा मित्रपक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेचे सर्वेसर्वा सदाभाऊ खोत यांनी एक खळबळजनक वक्तव्य केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. ते सांगलीतील एका कार्यक्रमात बोलत होते.यावेळी सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील कर्ण असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्जुन आहेत. तर, शरद पवार हे शकुनी मामा असल्याचे विधान सदाभाऊ खोत यांनी केले आहे. राजकीय वर्तुळात खोत यांच्या विधानाची चर्चा रंगली आहे.
महाराष्ट्रात विकासाचे व्हिजन असलेला नेता म्हणजे फडणवीस आहेत. मराठा समाजाचे आतापर्यंत अनेक मुख्यमंत्री झाले. पण यापैकी कोणत्याही मुख्यमंत्र्याने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. पण, 2019 मध्ये फडणवीस यांनी आरक्षण मिळवून दिले. मात्र, हे आरक्षण शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी घालवले. मात्र तरीही सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका झाली. प्रस्थापितांना धक्का देण्याचे काम फडणवीस यांनी केले होते. त्यामुळे शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणाततील शकुनीमामा असल्याचा घणाघात खोत यांनी केला.