नागपूर : कुही कोर्टात काम करणाऱ्या लिपिकाने नागपुरातील गोरेवाडा तलावात उडी मारून आत्महत्या केली. ड्युटीवरून रात्रीपर्यंत घरी न पोहोचल्याने कुटुंबीयांनी गिट्टीखदान पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. या व्यक्तीने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत 42 वर्षीय निलेश काटे हे त्यांच्या कुटुंबासह बोरगाव, गोरेवाडा रोड येथे राहत असून कुही कोर्टात कारकून म्हणून काम करत होते.निलेश हा मूळचा अमरावतीचा रहिवासी होता. गेल्या 5 वर्षांपासून ते कुही कोर्टात कर्तव्यावर होते नागपूरला बदली होण्यासाठी प्रयत्न करत होते.
मात्र, अनेक प्रयत्न करूनही त्यांची नागपूरला बदली होऊ शकली नाही. त्यामुळे ते डिप्रेशनमध्ये गेले. मंगळवारी सकाळी नऊ वाजता ते कोर्टात जाण्यासाठी घरातून बाहेर पडले मात्र ते कामावर पोहोचले नाहीत. सायंकाळी ते घरी न परतल्याने पत्नीने त्याच्या मोबाईलवर संपर्क साधला असता तो बंद आला. यानंतर गिट्टीखदान पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवून कारवाई करण्यात आली. याचदरम्यान गोरेवाडा तलावाच्या पाण्यात मृतदेह तरंगताना लोकांनी पाहिल्यानंतर त्यांनी गिट्टीखदान पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह पाण्याबाहेर काढला असता नीलेश काटे अशी ओळख पटली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला असून पुढील तपास सुरू केला आहे.