नागपूर:नागपूरच्या दाभा परिसरात स्कूल बसची कारला धडक दिल्याची घटना घडली आहे. माहितीनुसार, बस चालकाने भरधाव बस चालवत समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. या धडकेत दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.
या अपघातादरम्यान बसमध्ये शाळकरी मुले आणि कारमध्ये पालकांसह 2 चिमुकले प्रवास करत होते. सुदैवाने यात कोणालाही मोठी दुखापत झालेली नाही. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, चालक मानसिकदृष्ट्या अस्वस्थ दिसत होता आणि बस चालविण्यास योग्य स्थितीत नव्हता.
माहितीनुसार,अनिकेत पोहकार (वय 32) हे आपल्या पत्नी सुरभीसोबत त्यांचा मुलगा सिद्धार्थ या सांदीपनी शाळेतून घरी घेऊन येत होते. समोरून स्कूल बस येत असल्याने त्यांनी आपली क्रेटा कार अशादिप कॉलनी येथे धवल शाळेकडे जाणाऱ्या रोडवर थांबविली. मात्र समोरून स्कूल बस (एम. एच 40 के.एल. 3575) चालकाने बस भरधाव आणत पोहकार यांच्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात कोणालाही सुदैवाने दुखापत झाली नाही. मात्र कारचे मोठे नुकसान झाले. या अपघातामुळे स्कूल बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे आज अनेक विद्यार्थांना जीव धोक्यात गेल्याचे चित्र दिसले. त्यामुळे बस चालकाविरोधत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.