बडोदा: गेल्या तीन दिवसांपासून गुजरातमध्ये पुराने थैमान घातले आहे. आतापर्यंत या पूरामुळे २६ जणांचे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर पूरग्रस्त भागातून १८ हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. यानंतर गुरूवारी हवामान विभागाने १० जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट तर २२ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
गुजरात सरकारने दिलेल्या माहितीनुसार, मोरबी, बडौदा, भरूच, जामनगर, अरवली, पंचमहल, द्वारका आणि दांग या जिल्ह्यात प्रत्येकी एका नागरिकाचा मृत्यू झाला.
तर आनंद जिल्ह्यात सहा, अहमदाबादमध्ये चार आणि गांधीनगर, खेडा, महीसागर, दाहोड आणि सुरेंद्रनगरमध्ये प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरातमधील भीषण परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी फोनवरून संवाद साधत राज्यातील अन्यधान्याच्या साठ्याबाबत माहिती घेतली.
तसेच या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी केंद्र सरकार पूर्ण ताकदीनिशी गुजरातच्या पाठीशी असल्याचेही मोदी म्हणाले.
दरम्यान मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी शहरात ठिकठिकाणी एनडीआरएफचे आणखी पाच पथक बचाव कार्यासाठी तैनात केले आहेत.तसेच लष्कराचीही मदत घेतली जात आहे. बडौदामध्ये बचावकार्य सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.