नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी रामझुला अपघातप्रकरण राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग करण्याचे आदेश दिले.
तहसील पोलिसांनी केलेल्या तपासाबाबत पीडितांच्या कुटुंबीयांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे 30 ऑगस्ट रोजी हा निर्णय घेण्यात आला.
नागपुरातील रामझुला उड्डाणपुलावर 25 फेब्रुवारीला आरोपी महिला रितिका मालू हिने भरधाव मर्सिडीज-बेंझ (MH-49-AS-6111) कार चालवत दोन तरुणांना चिरडले.
या धडकेत दुचाकीवरील मोहम्मद हुसेन गुलाम मुस्तफा (३४) आणि मोहम्मद आतिफ झिया (३२) यांचा मृत्यू झाला. घटनेच्या वेळी मालू तिची मैत्रिण माधुरी सारडा हिच्यासोबत सीपी क्लबमधून मद्यधुंद अवस्थेत वर्धमान नगरला परतत होती.
अपघातानंतर दुसऱ्याच दिवशी मालूला जामीन मिळाल्याने पीडित कुटुंबांमध्ये असंतोष पसरला.याप्रकरणी तपास कठोर करण्याच्या मृतक कुटुंबियांच्या आवाहनामुळे आता उच्च न्यायालयाने हे प्रकरण सीआयडीकडे सोपवले आहे. ज्यामुळे तपासला गती मिळेल.