नागपूर : अमरावती येथील फासे पारधी समाजाच्या लोकांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील देवगिरी निवासस्थानी ‘शाळा भरो’ आंदोलन केले. यावेळी विद्यार्थ्यांसह त्यांचे पालकही येथे उपस्थित होते.
समृद्धी महामार्गाच्या बांधकामासोबत फासेपारधी समाजातील विद्यार्थ्यांसाठी बांधलेली आश्रमशाळा हटवण्यात आली. ही शाळा अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ चौहान येथे होती. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे मतीन भोसले म्हणाले की, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मुलांच्या पुनर्वसनासाठी आणि शाळेच्या पुनर्बांधणीसाठी सहा कोटी रुपयांचे आश्वासन दिले होते. मात्र हा निधी देण्यात आला नाही.
शाळेसाठी केवळ तीन शिक्षकांच्या नियुक्तीचा जीआर काढण्यात आला होता, मात्र तोही कागदावरच राहिला त्याचबरोबर फासेपारधी समाजाला 10 एकर जमीन देण्याची मागणीही पूर्ण झालेली नाही. यासोबतच प्रत्येकी अडीच लाख रुपयांच्या घरांचीही विशेष मागणी करण्यात आली होती, मात्र अद्याप त्याचा लाभ समाजाला मिळालेला नाही. या सर्व मागण्या घेऊन अमरावतीहून आलेल्या फासे पारधी समाजाच्या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी देवगिरीसमोर शाळा भरवून निदर्शने करून या प्रलंबित मागण्यांबाबत शासनाचे लक्ष वेधले.
या सर्व मागण्यांबाबत देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली तर समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण होऊ शकतील, अशी अपेक्षा मतीन भोसले यांनी व्यक्त केली