नागपूर : दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस उपनिरीक्षक शाम कनोजिया यांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मात्र या घटनेमागे किती सत्यता आहे. याबाबत आढावा घेण्यात आल्यानंतर काही बाबी समोर आल्या. शाम कनोजिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, हुडकेश्वर थाना अंतर्गत सर्वश्री नगर ५ सप्टेंबरला सकाळी ९:४० वाजता घरून पोलिस मुख्यालय नागपूर येथे पगारसंदर्भात काही व्यवहार करण्यासाठी आपल्या ऍक्टीव्हाने जात असताना घरापासून १० ते २० मीटर दरम्यान त्यांचे घरमालक त्यांना भेटले.
गजेंद्र मोहाडीकर असे त्यांच्या घरमालकाचे नाव आहे. तुम्ही घर केव्हा खाली करीत आहात असा प्रश्न त्यांनी कनोजिया यांना विचारला. मी १५ तारखेला खाली करतो असे कनोजिया त्यांना म्हणाले. मात्र याचदरम्यान आमदार मोहन मते यांनी कारमधून बाहेर येऊन माझी गच्ची पकडली आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच मते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मला मारहाण केल्याचे कनोजिया म्हणाले. याप्रकरणी मी मोहन मते आणि त्यांच्या सुनिल उमरेडकरसह कार्यकर्त्यांविरोधात हुडकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. मात्र आमदाराचा दबाव असल्याने त्यांच्यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप कनोजिया यांनी केला.
कनोजिया यांना मारहाण केली नाही- आमदार मोहन मते
पोलीस उपनिरीक्षक शाम कनोजिया यांना मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली नसल्याचे दक्षिण नागपूरचे आमदार मते म्हणाले. तसेच आपल्यावर करण्यात आलेले सर्व आरोप खोटे आणि बिनबुडाचे असल्याचे ते म्हणाले. ५ सप्टेंबर रोजी आपण सर्वश्री नगर परिसरात सीमेंट रोड चे भूमिपूजन करण्याच्या कार्यक्रमात गेले असल्याचे ते म्हणाले. यादरम्यान स्थानिक लोकांनी विशेषतः तीस -चाळीस महिलेने माझ्याकडे पोलीस उपनिरीक्षक कनोजिया यांच्याविरोधात तक्ररी दिल्या.परिसरातील नागरिक पीएसआय शाम कनोजियामुळे फार त्रस्त झाले आहेत.
गेल्या आठ महिन्यांपासून त्यांनी घरभाडेही दिले नाही, असे मते म्हणाले. त्यांच्या दिघोरी येथील सर्वश्री नगर,गजलक्ष्मी अपार्टमेंटमध्ये पीएसआय शाम कनोजियाच्या सहकार्यामुळे अवैध गतिविधि चालतात,असा आरोपही मते यांनी केला. या मतदासंघातील आमदार असल्याच्या नात्याने मी कनोजिया यांची समजूत घातली. त्यानंतर मी तेथून निघून गेलो, असे मते म्हणाले.
नागपूरचे पूर्व पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शाम कनोजिया यांची बदली त्यांच्याविरोधात येणाऱ्या तक्ररींमुळे हेड क़्वार्टर येथे केलेली होती. या बदलीच्या विरोधात कनोजिया न्यायालयात गेले होते. मात्र त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळली. सध्या ते मेडिकल बोर्ड लिव वर आहेत.
पोलीस चौकशीदरम्यान कनोजिया यांना मारहाण झाल्याचे आढळले नाही-
या घटनेप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांना संपर्क केला असता पीएसआय शाम कनोजिया यांनी आमदार मोहन मते आणि कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दिली असल्याचे सांगण्यात आले. या तक्रार अर्जाची वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनात चौकशी सुरु असल्याचे पोलीस म्हणाले. सूत्रानुसार पोलिसांनी तक्रार अर्जाची चौकशी सुरु केली असता कुठलीही मारहाणीची दिसून आलेली नाही. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मध्ये सुद्धा कुठलाही प्रकार दिसून येत नाही.पुढे तपासात काय निष्पन्न होते त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.