नागपूर : महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे यांच्या कारने रविवारी मध्यरात्री एका दुचाकीसह पाच गाडयांना धडक दिली. या अपघातावेळी संकेत यांच्यासह अर्जुन हावरे आणि रोनित चित्तमवार हे कारमध्ये होते. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत चौकशी करून सूचना पत्र देत सोडून दिले. नागपूर परिमंडळ क्र. 2 चे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.
डीसीपी राहुल मदने यांच्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री सीताबर्डी पोलीस स्टेशनअंतर्गत रामदास पेठ परिसरातील सेंटर पॉईंट हॉटेलसमोर भरधाव ऑडी कारने एका दुचाकीसह चारचाकी वाहनाला धडक दिली. या प्रकरणाचं सीसीटीव्ही फूटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावरून बरीच चर्चा सुरू झाली आहे. ही कार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुत्र संकेत बावनकुळे यांच्या मालकीची आहे. आधी कारची नंबरप्लेट काढून ठेवल्याचे दिसून आले. मात्र, नंतर ही नंबरप्लेट कारमध्येच असल्याचे मदने म्हणाले.
View this post on Instagram
चालक अर्जुन हावरे, संकेत बावनकुळे, रोनित चित्तमवार हे तिघे गाडीत होते. त्यानुसार आपण तिघांनाही चौकशीसाठी बोलवले होते. चौकशी झाली आहे. चालकाला अटक केली होती. रात्री उशीरा त्याला सूचना पत्र देऊन सोडण्यात आले.
कार अर्जुन हावरे चालवत होता तर संकेत बावनकुळे ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर आणि तिसरी व्यक्ती रोनित चित्तमवार मागच्या सीटवर बसले होते. याशिवाय, अपघात झाल्यानंतर पुढच्या चौकात या तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला.मात्र स्थानिक लोकांनी त्यांना मारहाण केली. त्याचीही चौकशी आम्ही करत असल्याचे मदने म्हणाले.
दरम्यान पोलिसांना प्राथमिक तपासात चालक नशेत होता असं आढळून आले आहे. डॉक्टरांनी तसे रिपोर्ट दिले आहेत. तिघांचेही रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले असल्याचेही मदने म्हणाले.