Published On : Wed, Sep 18th, 2024
By Nagpur Today Nagpur News

गणेशोत्सवादरम्यान 1 लाख 65 हजारांवर श्रीं च्या मूर्तींचे विसर्जन

- मनपा प्रशासनाच्या प्रयत्नामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सव संपन्न
Advertisement

नागपूर : गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर… या जय घोषात श्री गणरायाचे विसर्जन झाले. श्री गणरायाच्या विसर्जनासाठी मनपाद्वारे शहरातील दहाही झोनसह कोराडी येथे विशेष सोय करण्यात आली. श्रींच्या विसर्जनासाठी येणाऱ्या भक्तांना विसर्जन स्थळी कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याकरिता मनपाद्वारे करण्यात आलेल्या आवश्यक सोयी सुविधेचा प्रत्यक्ष आढावा मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी घेतला. शहरातील सर्व विसर्जन कुंडांवर एकूण 1 लाख 65 हजार 505 मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यंदाच्या गणेशोत्सवाला पर्यावरणपूरक साजरा करण्याच्या प्रशासनाच्या आवाहनाला गणेश भक्तांनी उत्तम साथ दिली. परिणामी पीओपीच्या मूर्तींच्या संख्येत मध्ये घट दिसून आली.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी शहरातील फुटाळा तलाव परिसर, सोनगाव तलाव परिसर, उज्वल नगर कृत्रिम तलाव, चिटणीस पार्क, टिमकी मनपा शाळा, कच्चीवीसा मैदान येथील कृत्रिम तलावाची पाहणी केली. तसेच अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी देखील विविध ठिकाणी भेट देत व्यवस्थेचा आढावा घेतला.

Advertisement
Today's Rate
Sat 21 Dec. 2024
Gold 24 KT 76,400/-
Gold 22 KT 71,100/-
Silver / Kg 88,000/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या प्रसंगी घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, उपायुक्त श्री. प्रकाश वराडे, श्री.मिलिंद मेश्राम, सहायक आयुक्त श्री. गणेश राठोड, श्री प्रमोद वानखेडे, वैघकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, कार्यकारी अभियंता श्री रविंद्र बुंधाडे, श्री. विजय गुरुबक्षानी, श्री. सचिन रक्षमवार, श्रीमती अल्पना पाटणे यांच्यासह उपद्रव शोध पथकाचे जवान, संबधित झोनचे स्वच्छता अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पाहणी दरम्यान भक्तांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, कृत्रिम तलाव परिसरात स्वच्छता राखावी, रात्रीच्या वेळी पुरेशी प्रकाश व्यवस्था ठेवावी, तसेच स्वच्छतेची विशेष काळजी घेण्याचे निर्देश आयुक्त डॉ. चौधरी यांनी दिले. विशेष म्हणजे, सोनगाव तलाव परिसरात पाहणी करतांना पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल यांची भेट घेतली. तसेच टिमकी येथील भेटदरम्यान आमदार विकास कुंभारे यांनी आयुक्तांचे स्वागत केले. याशिवाय आयुक्तांनी नागरिकांच्या मदतीसाठी विसर्जन स्थळी कार्यरत ग्रीन व्हीजील आणि यिन महा क्लब यांच्या स्वयंसेवकांच्या कार्याचे कौतूक केले. तर फुटाळा तलाव परिसरात पोलीस सहाय्यता केंद्र येथे सायबर पोलीस स्टेशनमार्फत सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करीत असणाऱ्या चमूला भेट देत माहिती जाणून घेतली.

मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार श्रीगणेशाच्या विजर्सनाकरिता नागपूर शहरातील सर्व तलावांमध्ये यावर्षी देखील पूर्णत: बंदी होती. त्यादृष्टीने सर्व तलाव बंद करून शहरातील दहाही झोन अंतर्गत विविध भागांमध्ये 419 पेक्षा अधिक कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांद्वारे स्थापना करण्यात येणा-या श्रीगणेशाच्या मोठ्या मूर्तींच्या विसर्जनाकरिता कोराडी येथील विशाल आकाराच्या विसर्जन कुंडामध्ये व्यवस्था करण्यात आली होती. चिटणीस पार्क येथे आमदार श्री. प्रवीण दटके यांच्या निधीतून जर्मनी येथून आणलेली 12 विसर्जन कुंडीची व्यवस्था करण्यात आली होती.

मनपाद्वारे सर्वच विसर्जन स्थळांवर निर्माल्य कलशाची व्यवस्था करण्यात आली होती. या कलशांमध्ये नागरिकांना निर्माल्य जमा करण्याचे आवाहन मनपा आणि स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांमार्फत करण्यात आले. नागरिकही या आवाहनाला प्रतिसाद देत निर्माल्य कलशामध्ये श्रीगणेशाचे निर्माल्य संकलित करून सहकार्य केले. याशिवाय मनपाद्वारे विशेष 12 निर्माल्य रथांची व्यवस्था करण्यात आलेली होती निर्माल्य रथाद्वारे गणेशोत्सवादरम्यान सर्व गणेश मंडळांकडून श्रद्धापूर्वक निर्माल्य संकलित करण्यात आले. मनपाद्वारे या निर्माल्यावर प्रक्रिया करून त्यापासून खत निर्मिती केली जाणार आहे.


शहरातील दहाही झोनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली. यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान 17 सप्टेंबर पर्यंत शहरातील सर्व विसर्जन कुंडांवर एकूण 165505 मूर्तींचे विसर्जन करण्यात आलेले आहे विशेष म्हणजे, एकूण विसर्जीत 165505 मूर्तींमध्ये 160809 मूर्ती मातीच्या तर पीओपीच्या फक्त 4696 मूर्तींचा समावेश आहे.

विसर्जन स्थळावरील स्वच्छतेकडे मनपाद्वारे विशेषत्वाने लक्ष देण्यात आले. 419 विसर्जन स्थळांवर कुठेही अस्वच्छता राहू नये यासाठी 1132 कर्मचारी निरंतर कार्यरत होते. विसर्जन स्थळांवरून 169.72 टन निर्माल्य संकलित करण्यात आले. याशिवाय कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये मूर्तींचे विसर्जन झाल्यानंतर त्या मूर्ती सन्मानपूर्वक आणि पूर्ण श्रद्धेने बाहेर काढण्याचे काम स्वच्छता चमूच्या विशेष पथकाने केले, मनपाची स्वच्छता चमू कोराडी येथील विसर्जन स्थळी देखील कार्यरत होते.

*पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला भक्तांची पसंती*
संपूर्ण गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा व्हावा याचे प्रयत्न प्रशासनाने केले. त्यानुसार नागरिकांना मातीच्या मूर्तींची स्थापना करण्याचे आवाहन मनपा आयुक्त डॉ. चौधरी यांनी केले होते. आवाहनाला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दर्शविला असून, यंदा पीओपीच्या फक्त 4696 चे विसर्जन झाले.

स्वयंसेवी संस्थांचा सक्रिय सहभाग
श्रीं च्या विसर्जनादरम्यान ग्रीन व्हीजील फाउंडेशन, यिन महा क्लब सारख्या स्वयंमसेवी संस्थांनी श्रीगणेश विसर्जन मध्ये मनपाला सहकार्य केले. मनपा अधिकार्यांसह या स्वयंसेवकांनी नागरिकांना मदत केली. व पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्व सांगितले. यात विशेष म्हणजे ग्रीन व्हीजीलच्या स्वयंसेवकांनी कौस्तुभ चटर्जी, सुरभी जयस्वाल आणि चमूच्या सहकार्याने गणेशोत्सवाच्या दहाही दिवस सेवा देण्यात आली.

Advertisement