नागपुरातील ऑक्सिजन बर्ड पार्कच्या माध्यमातून नागरिकांना परिसंस्था आणि पर्यावरणाचे महत्त्व कळेल असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले .नागपूरच्या वर्धा रोड वरील जामठा येथे नागपूर – हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील ऑक्सिजन बर्ड पार्कचे (अमृत महोत्सव पार्क) उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते .याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे सचिव अनुराग जैन ,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष संतोष कुमार यादव,रामटेकचे खासदार शामकुमार बर्वे प्रामुुुख्याने उपस्थित होते .
या बर्ड पार्कचे महत्त्व सांगताना गडकरी म्हणाले की, बर्ड पार्क मध्ये कार्बन डाय-ऑक्साइड शोषला जात असून ऑक्सिजन निर्मिती होते . पार्कमध्ये असणाऱ्या तलावात सध्या बदक आणि इतर पक्षी आहेत परंतु येथे फळझाडांची लागवड केल्याने येथे अनेक स्थलांतरित पक्षी सुद्धा येतील . राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे रस्ते निर्मिती सोबतच अनेक पर्यावरण संवर्धनाचे पुढाकार घेतले जात असल्याची त्यांनी माहिती दिली .यामध्ये वणी -वरोरा रोडवर सुमारे 80 किलोमीटर रस्त्यावर बांबूचे पर्यावरण पूरक क्रॅश बॅरियरची बांधणी ,स्टील ऐवजी उड्डाणपुलाच्या बांधकामांमध्ये ग्लास फायबरचा वापर , रस्ते निर्मितीमध्ये मुनिसिपल वेस्टचा वापर ,रस्ते निर्मितीसाठी तलाव खोलीकरणातून मिळणारी मातीचा वापर आणि त्या माध्यमातून अकोला, बुलढाणा , वाशिम या जिल्ह्यामध्ये जलसंवर्धनासाठी तलावाचीही निर्मिती यासारख्या उपक्रमांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला .
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक पेड मा के नाम ‘ अंतर्गत वृक्षारोपण करण्यासाठी आवाहन केले होते याच उपक्रमांतर्गत नितीन गडकरी यांनी या बर्ड पार्क मध्ये वडाच्या वृक्षाचे रोपण करून या अभियाना अंतर्गत लोकांनी रोपटे लावावे तसे आवाहन केले .2015 मध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ग्रीन हायवे धोरणा अंतर्गत आतापर्यंत सुमारे 4 कोटी वृक्ष लागवड केली असून ज्या झाडांचा रस्ते निर्मितीत अडथळा निर्माण होत होता अशा देशभरातील जवळपास 7 लाख वृक्षांचे यशस्वी प्रत्यारोपण देखील करण्यात आल्याची माहिती गडकरी यांनी दिली . वृक्ष लागवड करण्याकरिताचे कार्बन प्रिंट आणि कार्बन क्रेडिटचा जो निधी मिळतो त्या निधीचा उपयोग करून अशा पार्कच्या उभारणीसाठी एनएचआयने वापरावा .या बर्ड पार्कच्या माध्यमातूनच एका रोपवाटिकेची निर्मिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला लागणाऱ्या झाडांसाठी करावी अशी सूचना देखील त्यांनी केली.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे 17 सप्टेंबर पासून आतापर्यंत सुमारे 1 लाख रोपे ही ‘एक पेड मा के नाम ‘ उपक्रमा अंतर्गत लावल्या गेले असून रस्त्यांच्या निर्मितीमध्ये मुनिसिपल वेस्ट तसेच कचऱ्याचा उपयोग करून पर्यावरण पूरक रस्ते बांधणीला प्राधान्य दिले जात आहे असे केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयाचे सचिव अनुराग जैन यांनी सांगितले .
याप्रसंगी रामटेकचे खासदार श्याम कुमार बर्वे यांनी सांगितले की राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून चौपदरी आणि सहा पदरी रस्ते तयार होत असून हे रस्ते पर्यटन स्थळांसोबत सुद्धा जोडले गेले आहेत .
या कार्यक्रमापूर्वी गडकरी यांनी पार्क मधील फूड कोर्ट चे उद्घाटन केले आणि बर्ड पार्कची पाहणी अधिकाऱ्यांसोबत केलीयाप्रसंगी या बर्ड पार्कचे आर्किटेक हबीब खान तसेच कंत्राटदार यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नागपूर एनएचआयचे प्रादेशिक अधिकारी आर. पी. सिंग यांनी केले .या कार्यक्रमाला आमदार सर्वश्री टेकचंद सावरकर, आशिष जयस्वाल ,सुधाकर कुंभारे ,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते .
ऑक्सिजन बर्ड पार्क विषयी:
ऑक्सिजन बर्ड पार्क (अमृत महोत्सव उद्यान) हा एक पर्यावरणपूरक उपक्रम आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) वतीने नागपूर – हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील जामठाजवळ या उपक्रमाअंतर्गतचे उद्यान उभारले गेले आहे. या पार्कअंतर्गत सामाजिक वनीकरणासाठी अनिवार्यपणे राखीव असलेल्या 2.5 हेक्टर जागेसह एकूण 8.23 हेक्टर क्षेत्रात हे उद्यान उभारले गेले आहे.
पक्ष्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासाची सोय उपलब्ध व्हावी आणि त्याचबरोबरीने स्थानिक नागरिक तसेच पर्यटकांसाठीही दिलासा देणारे नैसर्गिक ठिकाण उपलब्ध होईल अशा रितीनेच हे उद्यान विकसित केले गेले आहे. या उद्यानाच्या माध्यमातून पर्यावरणीय शाश्वतता आणि करमणुकीच्या सुविधांचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या प्रकल्पाला मार्च 2023 मध्ये मान्यता औपचारिक मान्यता दिली गेली होती, तसेच 14 कोटी 31 लाख रुपयांच्या निधीची तरतुदही केली गेली होती.या उद्यानाला ऑक्सिजन पार्कचे दिलेले स्वरुप आणि त्या माध्यमातून शाश्वततेवर दिलेला भर हे या उद्यानाचे अत्यंत ठळक वैशिष्ट आहे. या उद्यानात वायू प्रदूषणात घट साध्य करून निरोगी पर्यावरणाला चालना देण्यासाठी वेगाने वाढणारी आणि ऑक्सिजन निर्मिती करणारी झाडे लावली आहेत. हा हरित प्रकल्प पूर्णत्वाला नेण्याच्या प्रक्रियेत तसेच या उद्यानाच्या देखभालीत नागपूरमधील सामाजिक वनीकरण विभागाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.या उद्यानामध्ये फुडकोर्ट तसेच जल संवर्धनाकरिता 30 वॉटर रिचार्ज पीटस् सुद्धा आहेत .