नागपूर : राज्याची उपराजधानी नवरात्रोत्सवाच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. गुरुवारी 3 ऑक्टोबरला घटस्थापना होणार असून नवरात्रोत्सवाच्या स्वागतासाठी बाजारपेठ सज्ज होत आहे. हे 9 दिवस अनेक ठिकाणी दांडिया, गरबा रासही खेळली जाते. नवरात्रनिमित्त देवी मूर्ती तयार करणाऱ्या कारागिरांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शेवटचा हात मूर्तीवरून फिरवला जात आहे. देवीच्या विविध स्वरूपाच्या मूर्तीची मागणी वाढली आहे.
सप्तशृंग देवी, दुर्गा देवी (शेरावाली), रेणुका देवी, तुळजाभवानी तसेच कोल्हापूरची महालक्ष्मी अशा विविध देवी मूर्ती साकारण्यात आल्या आहे. सप्तशृंगी आणि दुगदिवी यांची अधिक मागणी असल्याने या मुर्त्या अधिक साकारण्यात आल्या आहे. त्यातल्या त्यात ग्रामीण भागातून सप्तशृंग देवी मूर्तीस अधिक मागणी असल्याने त्यांचीही निर्मिती इतर तुलनेत अधिक करण्यात आली उत्सवाचे आयोजन करणाऱ्या सार्वजनिक मंडळाकडून तयारीस वेग आला आहे. अनेक मंडळाकडून देवी मूर्ती स्थापना केली जात असते. त्यानिमित्त देवी मूर्ती तयार करण्याचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे.
बहुतांशी मूर्ती तयार झाली असून उर्वरित मूर्त्यांवर कारागिरांकडून शेवटचा हात फिरवला जात आहे. आकर्षक अशा दीड ते दहा फुटापर्यंत मुर्त्या साकारण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी मूर्ती विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत.
देवीची नऊ रूपे-
सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तींचे दैवतीकरण होऊन त्या शक्तिरूप मूर्तीला देवी, असे नाव मिळाले आणि शाक्त संप्रदायी लोकांनी तिला सर्वश्रेष्ठ देवता, आदिमाया किंवा जगदंबा म्हणून गौरविले. देवीची उग्र व सौम्य अशी दोन रूपे पहायला मिळतात.उमा, गौरी, पार्वती, जगदंबा, भवानी ही देवीच्या सौम्य रूपांची नावे असून, दुर्गा, काली, चंडी, भैरवी, चामुंडा ही देवीची उग्र रूपे आहेत. तर शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडी, स्कंदमाता, कात्यायनी कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री अशी ही देवीची नऊ रूपे आहेत.