नागपूर : महायुती सरकारने जेव्हापासून लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. तेव्हापासून ती सतत चर्चेत राहिली. विरोधकांनी तर या योजनेचा विरोध करत महायुती सरकारला धारेवर धरले.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेबाबत मोठी घोषणा केली. लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्यात 1500 रुपयांऐवजी 3000 रुपये दिले जातील, असे फडणवीस म्हणाले. या घोषणेमुळे पात्र महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या दक्षिण-पश्चिम नागपुरातील जयताळा येथील बांधकाम कामगारांना किट वाटप समारंभाला उपस्थिती लावली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारने महिला व मुलींसाठी आणलेल्या योजनांची माहिती दिली. यावेळी बोलताना त्यांनी आपल्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजना आणल्याचे सांगितले. जिथे प्रत्येक महिलेला दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत.
माझ्या लाडक्या बहिणींना ऑक्टोबरमध्ये 3000 रुपये दिले जातील. कारण ऑक्टोबर महिन्यासोबतच नोव्हेंबर महिन्याचे पैसेही या महिन्यात दिले जातील.भावांकडून बहिणींना दिवाळीपूर्वीची ही भेट असेल, असेही फडणवीस म्हणाले.