नवी दिल्ली : महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.२० नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे तर २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे.यापार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी जागावाटपाची चर्चा सुरु केली.
मुख्यमंत्रीपद हे महत्त्वाचे पद, ते तुम्हाला देताना आमच्या माणसांनी त्याग केला. त्यामुळे जागावाटपाच्या चर्चेत शिंदेंनी मित्रपक्षांना झुकतं माप द्यावं असा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदेंकडे आग्रह धरल्याची माहिती सूत्रांनी दिली. दिल्लीत महायुतीची जागावाटपाची चर्चा सुरू असून केंद्रीय मंत्री अमित शाहांनी एकनाथ शिंदेंना उद्देशून हे वक्तव्य केल्याची माहिती समोर येत आहे.
महायुतीतील जागावाटपावरून मित्रपक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. एकनाथ शिंदेंनी आपल्या पदरात जास्तीत जास्त जागा पाडून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यानंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्यासमोर ही अट ठेवल्याची माहिती समोर येत आहे. या देशात पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि प्रांत ही तीनच पदं महत्त्वाची आहेत. बाकी गृहमंत्र्यांसह सर्व पदं फक्त व्यवस्था आहे. ती काम पूर्ण होण्यासाठी केलेली व्यवस्था आहे.
आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रिपद दिलं. तुमच्यासाठी आमच्या माणसांना त्याग करावा लागला. त्यामुळे जागावाटपात मित्रपक्षांना झुकतं माप द्या, असे अमित शाहा शिंदेंना म्हणाल्याचे कळते.