नागपूर:महाराष्ट्रात सध्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. तर दुसरीकडे आचारसंहिता लागू झाल्यापासून नागपूर पोलिसांची करडी नजर आहे. आज सीताबर्डी पोलिसांनी निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू असताना, निवडणूक-संबंधित क्रियाकलापांशी संबंधित असल्याच्या संशयावरून मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रोकड वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 ऑक्टोबर 2024 रोजी महाराजबाग स्क्वेअर येथे नियमित तपासणी दरम्यान, पोलिस कर्मचाऱ्यांना मोटारसायकलवरून विद्यापीठ लायब्ररी स्क्वेअरकडे जाणारा एक संशयित व्यक्ती दिसला.
उमेश रामसिंग ऐदबान (वय ५० वर्ष व्यवसाय – अमृत तुल्य दुकान चालक रा. प्लॉट नं. १६९, मानेवाडा वेणु कॉर्नर, पो. ठाणे अजनी) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीकडून ७,९३,५० रोख रक्कम जप्त केली आहे. सीताबर्डी पोलिसांनी याप्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निकाल घोषित होईपर्यंतच्या कालावधीत आचारसंहिता लागू असेल. या कालावधीत राज्यात अवैध दारुची निर्मिती, वाहतूक तसेच विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अवैध मद्यावर राज्य उत्पादन शुल्क, आणि पोलिसांची करडी नजर आहे. कठोर कारवाई करण्याकरिता पथके नेमण्यात आली आहेत. परराज्यातील मद्याची अवैध वाहतूक रोखणे, रात्रीची गस्त, संशयित वाहनांची तपासणी तसेच अवैध दारु धंद्याना प्रतिबंध करण्याच्या सूचना सर्व पथकांना देण्यात आल्या. त्यानुसार पथकांकडून अवैध मद्यावर सातत्याने कारवाई करण्यात येत आहे.