नागपूर: दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात जुने प्रतिस्पर्धी, विद्यमान आमदार मोहन मते आणि काँग्रेसचे उमेदवार गिरीश पांडव यांच्यात थेट लढत होणार आहे. कारण अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी मतदारसंघात कोणताही मोठा बदल झालेला नाही. दक्षिण -पश्चिम वगळता हा एकमेव मतदारसंघ आहे जिथे उमेदवारी प्रक्रियेदरम्यान बंडखोरी झालेली नाही.
दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्रात भाजपने मोहन मते यांना सलग दुसऱ्यांदा संधी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर गिरीश पांडव यांनाही काँग्रेसने सलग दुसऱ्यांदा मोहन मते यांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरवत आव्हान दिले आहे.
गेल्या 2019 च्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपच्या लढतीत मोहन मते यांचा फार कमी मताधिक्याने विजय झाला होता. त्यामुळे यंदा ही ही लढाई अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे. तसेच या मतदारसंघात दुसरा कोणताही बलाढ्य उमेदवार रिंगणात नसल्यामुळे 20 नोव्हेंबरला सरळ लढत निश्चित झाली आहे.
दक्षिण नागपूर या जागेवरून महाविकास आघाडीत मतभेद –
दक्षिण नागपूर या जागेवरून महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू होती. शिवसेनेने नागपूर जिल्ह्यातील दक्षिण नागपूर आणि रामटेक या दोन जागा लढण्याचा आग्रह धरला होता. तर रामटेक लोकसभेची जागा जिंकल्यामुळे ग्रामीणमधील आणि शहरातील सर्व जागा आपल्याकडे राहाव्यात यासाठी काँग्रेसचे प्रयत्न होते. गेल्या आठभरापासून या जागेवरून घमासान सुरू होते. पण रामटेकमधून काँग्रेस माघार घेतली. त्यानंतर लगेच शिवसेनेने रामटेकचा उमेदवार जाहीर केला.
तरी देखील दक्षिण नागपूरचा तिढा काही सुटत नव्हता. अखेर महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या पेचात सापडलेला दक्षिण नागपूर मतदारसंघ राखण्यात अखेर काँग्रेसला यश मिळाले. पण, या पक्षासमोर वेगळाच पेच होता. या जागेवर लढण्यासाठी काँग्रेसमध्ये तीन-चार इच्छुक होते. पक्षाने मात्र गेल्यावेळी विजयाने हुलकावणी दिलेल्या गिरीश पांडव यांना पुन्हा उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे .