नागपूर: विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून सर्व राजकीय पक्षांचे नेतेमंडळी उमेदवाराच्या प्रचारासाठी कामाला लागले आहे. तसेच सर्व विधानसभेचे उमेदवारही आपल्याला मतदान करावे यासाठी आपापल्या मतदारसंघात फेरफटका मारत आहेत. हे पाहता देशाच्या केंद्रस्थानी असलेल्या आणि राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात यंदा कोणाची हवा असणार आहे, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. यासंदर्भात ‘नागपूर टुडे’ने वरीष्ठ पत्रकार प्रदीप मैत्र यांच्याशी संवाद साधला.
दक्षिण-पश्चिम मतदारसंघात फडणवीस यांच्या विजयाची दाट शक्यता –
नागपूरच्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवार असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रत्यक्ष सहाव्यादा निवडनुकीच्या मैदानात उतरले आहेत. काँग्रेसने त्यांच्या विरोधात प्रफुल्ल गुडधे पाटील यांना उमेदवारी दिली. दोन्ही नेत्यांमध्ये कटे की टक्कर असली तरी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची या मतदारसंघातून जिंकून येण्याची शक्यता जास्त असल्याचे मत मैत्र यांनी व्यक्त केले.
उत्तर नागपुरातून नितीन राऊत यांचे पारडे जड –
उत्तर नागपुरातून काँग्रेस उमेदवार नितीन राऊत हे बहुमताने निवडून येऊ शकतात असेही मैत्र म्हणाले. कारण उत्तर नागपुरात काँग्रेसचे नितीन राऊत तर भाजपच्या मिलिंद माने यांच्यात लढत होणार असल्याचे खरे चित्र स्पष्ट झाले आहे. तरी देखील मतदारसंघात या दोन्ही नेत्यांना टक्कर देण्यासाठी २६ जण निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. तरी देखील राऊत यांचे पारडे जड असून ते या मतदारसंघात विद्यमान आमदारही आहेत, असे मत मैत्र यांनी व्यक्त केले.
पश्चिम नागपुरातून तिरंगी लढत –
पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली तर भाजपने सुधाकर कोहळे यांना तिकीट दिले. मात्र या ठिकाणी विकास ठाकरे यांची बाजू भक्कम असल्याचे मैत्र म्हणाले.पण तरी देखील या मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार विकास ठाकरे आणि भाजपचे जिल्हा प्रमुख सुधाकर कोहळे यांना टक्कर देण्यासाठी अपक्ष उमेदवार म्हणून नरेंद्र जिचकार मैदानात उतरले आहे. त्यामुळे पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात होणारी लढत अटीतटीची असेल.
दक्षिण नागपुरात होणार अटीतटीचा सामना –
दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात जुने प्रतिस्पर्धी, विद्यमान आमदार मोहन मते आणि काँग्रेसचे उमेदवार गिरीश पांडव यांच्यात थेट लढत होणार आहे. दक्षिण -पश्चिम वगळता हा एकमेव मतदारसंघ आहे जिथे उमेदवारी प्रक्रियेदरम्यान बंडखोरी झालेली नाही. त्यामुळे भाजपसाठी काँग्रेसचे आव्हान यंदा तगडे राहणार आहे.
पूर्व नागपुरात कृष्णा खोपडे यांची बाजू भक्कम –
पूर्व नागपूरमध्ये मात्र चौरंगीचे चित्र आहे. भाजपची ताकद असलेल्या या मतदारसंघात विद्यमान आमदार कृष्णा खोपडे यांची बाजू सध्या वरचढ दिसत असली तरी मविआत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे गेलेल्या या जागेवरून पक्षाचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे समोर आहेत. गेल्या वेळी 80 हजार मतदान घेणारे व काँग्रेसकडून बंडखोरी करणारे माजी नगरसेवक पुरुषोत्तम हजारे व ज्येष्ठ माजी नगरसेविका तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या आभा पांडेही या लढतीला चौरंगीच्या दिशेने घेऊन गेले आहेत. मात्र तरी देखील या मतदारसंघात खोपडे ताकद जास्त आल्याने त्यांची निवडून येण्याची शक्यता जास्त दिसत असल्याचे मैत्र म्हणाले.
नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेचे उमेदवार बंटी शेळके यांची बाजू जड –
नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात
महाविकास आघाडीकडून काँग्रेस उमेदवार बंटी शेळके आणि महायुतीकडून भाजप उमेदवार प्रवीण दटके आणि रमेश पुणेकर यांच्यात सामना रंगणार आहे. आता प्रचाराला सुरुवात झाली असून काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांनी मोठा दावा केला आहे. मात्र या मतदारसंघात काँग्रेसच्या बंटी शेळके यांची निवडून येण्याची शक्यता जास्त असल्याचे मैत्र म्हणाले.