नागपूर : पश्चिम नागपुरातील अपक्ष उमेदवार नरेंद्र जिचकार यांच्यावर आचारसंहिता भंगाचा आरोप करण्यात आला असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील महेंद्र नगर आणि मोतीबाग संकुलातून २७०० हून अधिक धान्याचे किट जप्त करण्यात आले आहेत. या किटमध्ये जिचकार यांची प्रचारपत्रके जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी तक्रारीनंतर त्यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
मोतीबाग सेंट्रल रेल्वे कॉलनी, नागपूरमध्ये 220 रेशन किट जप्त करण्यात आल्या आहेत. त्याचवेळी महेंद्र नगर येथून 2500 हून अधिक धान्याचे किट जप्त करण्यात आले. ज्याची किंमत 15 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. निवडणूक आयोगाच्या पथकाने ही कारवाई केली.
दोन्ही ठिकाणांहून जप्त करण्यात आलेल्या सर्व रेशन पाकिटांमध्ये पश्चिम नागपूरचे अपक्ष उमेदवार नरेंद्र जिचकार यांच्या प्रचाराची पत्रके आढळून आली. या भागातील मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी रेशन किटचे वाटप करण्यात येत असल्याची माहिती आयोगाला मिळाली होती. पोलीस पथकाने तपासणी केली असता हे किट जप्त करण्यात आले.
याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर जिचकार यांनी हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. धान्याचे किट माझे नसून माझी बदनामी करण्यासाठी त्या किटमध्ये जाणीवपूर्वक पत्रे टाकण्यात आली आल्याचे जिचकार म्हणाले.