नागपूर :विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना सुरुवात झाली आहे. नुकतेच काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते राजेंद्र मुळक यांची बंडखोरी केल्यामुळे हकालपट्टी केली.
रामटेक विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ठाकरे यांच्याविरोधात मुळक हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. मात्र पक्षाचा आदेश डावलून काँग्रेसचे नेते बंडखोर उमेदवाराचा संपूर्ण ताकदीने प्रचार करत असून महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात मते मागत असल्याचे दिसून येत आहे.आज सोमवारी सकाळी रामटेक विधानसभा मतदारसंघातील चाचेर गावात बंडखोर उमेदवार राजेंद्र मुळक यांची प्रचार सभा झाली. या प्रचार सभेत काँग्रेस नेते सुनील केदार, रामटेक मतदारसंघाचे खासदार श्याम बर्वे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे बंडखोर उमेदवार राजेंद्र मुळक यांच्यासाठी मते मागताना दिसल्याने महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ उडाली.