नागपूर:विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असून उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. यापार्श्वभूमीवर नागपूर पश्चिम मतदारसंघात अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे. या मतदारसंघात काँग्रेसने विद्यमान आमदार विकास ठाकरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. तर भाजपने सुधाकर कोहळे यांना उमेदवारी दिली. तर अपक्ष उमेदवार म्हणून नरेंद्र जिचकार हे देखील निवडणूक लढणार आहेत.
सर्व नेत्यांमध्ये या मतदारसंघात आपली ताकद पणाला लावण्यास सुरुवात केली असून जोरात प्रचार सुरू आहे. याच दरम्यान ‘नागपूर टुडे’ने विकास ठाकरे आणि सुधाकर कोहळे यांच्याशी संवाद साधत चर्चा विविध मुद्द्यांवर चर्चा केली. या मुलाखतीत दोन्ही नेत्यांनी विधानसभा निवडणूक जिंकण्याचा दावा केला आहे.
जनतेला मूलभूत सुविधा देण्यावर माझा भर – विकास ठाकरे
मी नगरसेवक, महापौर ते आमदार असा प्रवास केला असून, नागरिकांशी सतत संपर्कात असतो. माझ्या मतदारसंघात विद्यमान आमदार म्हणून मी आतापर्यंत जे काही काम केले त्यावर जनताही खुश आहे. भावी काळातही माझ्या मतदारसंघातील जनतेला मूलभूत सुविधा देण्यासाठी मी काम करेल,असे विकास ठाकरे म्हणाले.
सरकारने शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून मेट्रो, रस्ते, फाऊंटन असे विविध प्रकल्प तयार केले आहेत. मात्र स्थानिक जनतेला मूलभूत सुविधाच उपलब्ध होणार नाही तर या सर्व गोष्टींचा काय फायदा,असेही विकास ठाकरे म्हणाले.दरम्यान या निवडणुकीत काँग्रेस समोर मतविभाजनाचा धोका नाही,असेही ते म्हणाले.
पश्चिम नागपूरच्या विकासासाठी भाजपचा आमदार निवडून येणे गरजेचे – सुधाकर कोहळे
पश्चिम नागपूर मतदारसंघातील जनतेशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेत आहे. या मतदारसंघाच्या विकासासाठी भाजपचा आमदार निवडून येणे गरजेचे आहे.
पश्चिम नागपुरात जनता नक्कीच मोठ्या मताधिक्याने मला निवडून देईल, असा विश्वास कोहळे यांनी व्यक्त केला. तसेच लाडकी बहीण योजनेमुळे या मतदरसंघातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच या मतदरसंघात विकसित- अविकसित भागही आहे. कोट्यवधीचे प्रकल्प रखडले असून यात गोरेवाडा,मानकापूर स्टेडियम, जिल्हा रुग्णालय यांची कामे पूर्णत्वास आणणार असल्याचे कोहळे म्हणाले.