नागपूर : राज्याचे लक्ष लागलेल्या नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपचे ज्येष्ठ नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चौथ्यांदा रिंगणात असून त्यांच्याविरोधात काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रफुल्ल गुडधे पाटील मैदानात आहेत. विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच फडणवीसांना आव्हान देणासाठी प्रफुल्ल गुडधे यांनी कंबर कसली होती. यासंदर्भात ‘नागपूर टुडे’शी चर्चा करतांना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
जनतेला आता परिवर्तन हवे –
देवेंद्र फडणवीस विरुद्ध गुडधे पाटील यांच्यात यापूर्वी 2014 मध्येही लढत झाली होती व त्यात फडणवीस विजयी ठरले होते.याबाबत बोलताना गुडधे म्हणाले की, 2014 मध्ये मोदी लाट होती शिवाय भजपाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून फडणवीस निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. स्थानिकांनी या भावनेने त्यांना भरभरून मते दिली. त्यानंतर 2019 मध्ये पक्षाने मला निवडणूक लढण्याची संधी दिली होती. पण माझ्याकडे पैसे नसल्याने मी तिकीट घेतले नाही. त्यामुळे फडणवीस पुन्हा निवडून आले. मात्र आता सत्तेची समीकरणे बदलली आहे. जनतेला आता परिवर्तन हवे आहे. त्यामुळं ही निवडणूक अटीतटीची होणार असल्याचे प्रफुल्ल गुडधे म्हणाले. गेल्या २५ वर्षांपासून फडणवीस दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. पहिल्यांदा आमदार झाल्यावर ते देवेन जी होते. दुसऱ्यांदा आमदार झाल्यावर ते देवेंद्रजी झाले तिसऱ्यांदा ते देवेंद्र साहेब झाले.मात्र आता काळ बदलला आणि ते देवा भाऊ म्हणून मिरवू लागले, असा घणाघातही गुडधे यांनी केला.
दरम्यान 2009 मध्ये फडणवीस यांनी कॉँग्रेसचे विकास ठाकरे यांचा 27 हजार मतांनी, 2014 मध्ये कॉँग्रेसचे प्रफुल गुडधे पाटील यांचा 58 हजार मतांनी व 2019मध्ये कॉँग्रेसचे डॉ.आशीष देशमुख यांचा 49 हजार मतांनी पराभव केला होता. हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो.मात्र गुडधे पाटील परिवर्तनाचा नारा देत फडणवीसांच्या विरोधात रिंगणात आहेत. एक अभ्यासू नगरसेवक आणि पक्षनिष्ठ कार्यकर्ता अशी ओळख गुडधे यांची या मतदारसंघात आहे.