नागपूर: नागपूरहून कोलकाता-जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचे गुरुवारी सकाळी रायपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर लँडिंगचा निर्णय घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.या विमानात 187 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्स प्रवास करत होते.
नागपूरहून कोलकात्यासाठी उड्डाण केलेल्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी विमानतळ अधिकाऱ्यांना मिळाली, अशी माहिती रायपूरचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक संतोष सिंह यांनी दिली. हे विमान सकाळी 9 वाजता छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील विमानतळावर उतरले आणि अनिवार्य सुरक्षा तपासणीसाठी ताबडतोब आयसोलेशन बे मध्ये नेण्यात आले, असे अधिकाऱ्याने सांगितले.तांत्रिक कर्मचारी आणि बॉम्बशोधक पथकाकडून विमानाची कसून तपासणी केली जात असल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान विमानांत बॉम्ब ठेवण्याच्या निनावी धमक्या काही थांबायचे नावच घेत नाहीएत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसात हे प्रमाण वाढतच चालले आहे.