नागपूर : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या ‘हेवीवेट’ लढत नागपुरातील दक्षिण पश्चिम मतदारसंघात होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सलग चौथ्यांदा लढून विक्रम प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात आहेत, तर काँग्रेसने ही लढत वजनदार करण्यासाठी प्रफुल्ल गुडधे पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये अटीतटीचा सामना रंगणार असल्याचे वरिष्ठ पत्रकार सचिन द्रवेकर हे ‘नागपूर टुडे’शी बोलतांना म्हणाले.
या मतदारसंघाचा जन्म झाल्यापासून, म्हणजेच मागील तीन निवडणुकांपासून देवेंद्र फडणवीस याच मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत आणि विजयी होत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात भाजपचे समर्थन करणारा मतदार मोठ्या प्रमाणात आहे. पण लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय समीकरण बदलले असून विधानसभा निवडणुकीत भाजपाला थोडी जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. पण सध्या प्रफुल्ल गुडधे मोठ्या नियोजन पद्धतीने येथे प्रचार करत असून त्यांचीही ताकद याठिकाणी जास्त दिसत आहे.
नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळणार असून याठिकाणहून देवेंद्र फडणवीस आणि प्रफुल्ल गुडधे पाटील यांच्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागल्याचेही द्रवेकर म्हणाले आहेत.