नागपूर : नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेस उमेदवार बंटी शेळके आणि महायुतीकडून भाजप उमेदवार प्रवीण दटके आणि रमेश पुणेकर यांच्यात सामना रंगणार आहे. आता प्रचाराला सुरुवात झाली असून दोन्ही भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांकडून जिंकण्याचा दावा करण्यात येत आहे.
‘नागपूर टुडे’ने निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचार करताना दोन्ही नेत्यांची संवाद साधला.
मध्य नागपुरात रोजगार निर्मितीकडे लक्ष केंद्रित करणार – प्रवीण दटके
नागपुरातील सहाही मतदारसंघात भाजपचे उमेदवार बहुमताने निवडून येणार आहेत. कारण आमचे नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात मोठ्या प्रमाणात विकास केला.जनता त्यांच्या कामावर खुश आहे. तसेच लाडकी बहीण योजनेमुळे महिलांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. मध्य नागपुरातील जनता नक्कीच भाजपचा आमदार निवडून आणणार असल्याचा विश्वास दटके यांनी व्यक्त केला. आमदार म्हणून निवडणूक आल्याचा मध्य नागपुरातील प्रलंबित प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणार आहे. याठिकाणी रोजगार निर्मितीवर माझा भर असेल, असे दटके म्हणाले.
मध्य नागपूरचा विकास नियोजित पद्धतीने करणार – बंटी शेळके
विधानसभा प्रचाराला सुरुवात झाली असून काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांनी जिंकण्याचा मोठा दावा केला आहे. भाजपने जनतेची दिशाभूल केली आहे.सामान्य नागरिकांच्या खात्यात १५ लाख रुपये टाकण्याचे त्यांचे आश्वासन फोल ठरले. आता ते केवळ महिलांच्या खात्यात १५०० रुपये टाकत आहे. नागपुरात नियोजित विकास केवळ नेत्यांच्या घरासमोरच झाला. मात्र सर्वसामान्य नागरिकांना आजही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे शेळके म्हणाले. संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच”,असा मोठा दावा मध्य नागपूरमधील काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांनी केला आहे. नागपूर मध्य विधानसभा क्षेत्रअंतर्गत गल्लीबोळात फिरून काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांनी त्यांचा प्रचारही सुरू केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात आहे. त्या ठिकाणी बंटी शेळके काँग्रेसचे उमेदवार असून यंदा भाजपच्या आणि संघाच्या गडात आम्ही आमचा (काँग्रेस) झेंडा रोवू असा बंटी शेळके यांचा दावा आहे