नागपूर : देशाच्या केंद्रस्थानी असलेल्या आणि राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर जिल्ह्यात यंदा कोणाची हवा असणार आहे, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. यातच पूर्व नागपुरातील भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांपैकी कोण बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. गेल्या तीन टर्म पासून भाजपने एकहाती सत्ता प्रस्थापित केलेल्या पूर्व नागपुरात यंदा निवडणुकीची चुरस पाहायला मिळत आहे. कारण एकीकडे भाजपचे उमेदवार कृष्णा खोपडे हे विजयाचा चौकार लावण्यासाठी मैदानात उतरले आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दुनेश्वर पेठे यांनी खोपडे यांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे. दोन्ही नेत्यांनी नागपूर टुडेशी संवाद साधत मतदारसंघातील मूलभूत प्रश्नांवर भाष्य केले.
पूर्व नागपूरला विकासाचे मॉडेल म्हणून पहिल्या जाते – कृष्णा खोपडे
भाजपचे उमेदवार कृष्णा खोपडे हे पूर्व नागपुरातून तीन वेळा निवडून आले आहे.यंदा त्यांची चौथी टर्म असून जनता नक्कीच मला बहुमताने निवडून देणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पूर्व नागपूरला विकासाचे मॉडेल म्हणून पहिल्या जाते. या भागात झालेल्या विकासामुळे येथील स्थानिक जनतेत आनंदाचे वातावरण आहे. येत्या काळात मतदारसंघाची कायापालट करणार असून येथील युवकांना रोजगार मिळवून देणार असल्याचे खोपडे म्हणाले. जनता महायुती सरकारच्या कामावर खुश असून नागपूरच्या सहाही मतदारसंघात भाजपचा उमेदवार निवडून येणार असे खोडपे म्हणाले. भाजपाला आव्हान देण्यासाठी महाविकास आघाडीने महालक्ष्मी योजना आणली. मात्र त्यांच्या मनात काळे असून ते केवळ महिलांना मतांसाठी भूलथापा देत असल्याचे खोपडे म्हणाले. तसेच काँग्रेसचे घोषणा पत्र पानचट असल्याची टीकाही त्यांनी केली.
पूर्व नागपूरचा विकास अनियोजितरित्या, डम्पिंग यार्डचा प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देणार – दुनेश्वर पेठे
पूर्व नागपुरात आतापर्यंत जे काही काम झाले ते अनियोजितरित्या झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार दुनेश्वर पेठे यांनी केली. याठिकाणी अदानी आंबानी च्या कंपनीला फायदा पोहोचविण्याचे काम झाले. गेल्या १५ वर्षांपासून रेंगाळत असलेल्या पडलेले डम्पिंग यार्डचे काम अद्यापही झाले नाही. डम्पिंग यार्डचू अवस्था दयनीय झाली असून यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामळे डम्पिंग यार्डचा प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देणार असल्याचे पेठे म्हणाले. जनता नक्कीच मला जिंकून आणणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.