नागपूर : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी ७ वाजताच मतदानाला सुरुवात झाली आहे. नागपुरातही नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावण्यास सुरुवात केली. याचदरम्यान दक्षिण -पश्चिम नागपूर मतदारसंघात गोंधळाची स्थिती पाहायला मिळाली. मतदानाच्या दिवशी मोठ्या उत्साहात मतदान केंद्रावर आपले बहुमूल्य मत द्यायला गेलेल्या महिलेला आपल्या नावाचं मत आधीच कुणीतरी दिल्याचे समजताच महिलेने संताप व्यक्त केला. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
उज्ज्वला भीमराव पाटील रामेश्वरी परिसरातील शताब्दी चौक येथील रहिवासी आहे.आज सकाळी उज्ज्वला आपल्या मैत्रिणीसह मतदान करण्यास गेल्या होत्या. मात्र त्यांच्या नावाने अगोदरच एका महिलेने मतदान केल्याचे त्यांना कळाले. हे माहिती होताच त्यांना मोठा धक्का बसला. याबाबत शहानिशा कारण्यासाठी त्यांनी मतदान केंद्रावर असलेल्या अधिकाऱ्यांशी यासंदर्भात माहिती दिली. मात्र अधिकाऱ्यांनी त्यांना तुमचे मतदान झाले असून ओळख पत्रावरील फोटोने काहीच फरक पडत नाही, असे उत्तर दिले.
यावर उज्ज्वला पाटील यांनी संताप व्यक्त केला. या सर्व प्रकारावरून महिलेच्या नावाने बोगस मतदान झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
अशा परिस्थितीत काय करावे –
भारतीय निवडणूक व्यवहार अधिनियम -1961 च्या 49P या कलमानुसार, सच्चा मतदार त्याच्या अधिकारापासून वंचित राहू नये यासाठी काही तरतूद करण्यात आली आहे.त्यानुसार तुमच्याऐवजी दुसऱ्या कुणी तुमच्या नावावर मत नोंदवले असेल आणि खरे तुम्ही मतदार असाल तर तुम्ही मतदार केंद्राच्या पीठासीन अधिकाराकडे अपील करू शकता. अर्थात, तुम्हीच खरे मतदार आहात हे सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे मतदार ओळखपत्र, निवडणूक आयोगाने दिलेल्या मतदान केंद्राच्या स्लिप अशी कागदपत्रे असायला हवीत.पीठासीन अधिकाऱ्याने विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देऊ शकलात, तर केंद्रप्रमुख अधिकारी तुम्हाला मत देण्याची परवानगी देऊ शकतो/शकते.