नागपूर : राज्यभरात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे वातावरण आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या कामात मोठ्या संख्येने शिक्षक निवडणूक ड्युटीवर अहेत. त्यामुळे अनेक शाळांना 18, 19 आणि 20 नोव्हेंबरला शाळा चालविणे अशक्य आहे. त्यामुळे राज्य सरकारने याबाबत शाळांना विनंती पत्र पाठवले आहे. ज्या शाळांना शाळा भरवणे कठीण आहे त्या शाळांना सुट्टी देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या सचिवांकडून सर्व शाळांना तसं विनंती पत्र पाठवण्यात आले आहे. मात्र तरी देखील नागपुरातील मानेवाडा परिसरातील उदय नगर येथील विकास पब्लिक स्कूल सुरु असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. नागपूर टुडेच्या टीमने यासंदर्भात शाळेतील शिक्षकांशी संपर्क साधला असताना विद्यार्थी याठिकाणी गॅदरिंगसाठी जमल्याचे ते म्हणाले. याबाबत सविस्तर घेण्यासाठी नागपूर टुडेने जिल्हाअधिकारी कार्यालयात संपर्क साधला असता त्यांनी यावर कोणताही प्रतिसाद दिला नाही.
शिक्षण विभागाचे निर्देश –
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी अनेक शिक्षकांना निवडणूक कर्तव्यावर पाठवले जाणार आहे. त्यामुळे १८ ते २० नोव्हेंबर या कालावधीत शाळा भरवणे शक्य नसल्यास मुख्याध्यापकांना त्यांच्या अखत्यारित शाळा बंद ठेवण्यासंदर्भातील निर्णय घेण्यासाठी आवश्यक सूचना देण्याचे निर्देश शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्तांना दिले आहेत.
अनेक शाळांमध्ये मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत. अनेक शिक्षकांची नियुक्तीही त्यासाठी झालेली आहे. या पार्श्वभूमीवर १८, १९ आणि २० नोव्हेंबर रोजी शाळांना सुट्टी देण्याचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयाने शिक्षण विभागाला सादर केला होता. शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी परिपत्रकाद्वारे शिक्षण आयुक्तांना निर्देश दिले आहेत.