मुंबई : राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना दर महिन्याला 2 हजार 100 रुपये मिळणार आहेत. मात्र आता निकालानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निकषात मोठे बदल केले जाणार असल्याचे बोलले जात आहे. आता यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारला धारेवर धरले.
राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेवरुन सरकारवर टीका केली. लाडकी बहीण योजनेवरुन आता तुमचे डोळे उघडले आहेत. या योजनेचा बोजा सरकारच्या तिजोरीवर पडतोय, त्यामुळे ती योजना बंद कारण्यासाठी सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. असे राऊत म्हणाले. नव्याने स्थापन झालेल्या सरकारला पैसे कुठून आणणार, हे लक्षात आले आहे. आता आमची एवढीच प्रार्थना आहे की ज्या महिलांना पैसे दिलेत ते काढून घेऊ नका. त्यांना नोटीस पाठवून पैसे जमा करा, असे सांगू नका. तुम्ही काहीही करु शकता. हे जे काही सुरु आहे, त्यावर आमचं बारीक लक्ष आहे, असेही राऊत म्हणाले.