नागपूर : शहरात ‘वेडिंग इन्व्हिटेशनच्या नावाने मोठा स्कॅम होत असल्याचा प्रकार उघडकीस आला.. यामाध्यमातून स्थानिक नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक होत असल्याची तक्रारी समोर आल्या आहेत. नागपुरातच नाही तर राज्यभरातून अशाप्रकारची फसवणूक झाल्याच्या शेकडो तक्रारी समोर आल्या आहे.
सायबर गुन्हेगारांकडून नवनवीन फंडे वापरून ग्राहकांना जाळ्यात ओढण्यात येत आहे. पूर्वी बँकेतून बोलत असल्याची भीती घालून सायबर गुन्हेगार एटीएम कार्डचा पासवर्ड मिळून फसवणूक करीत होते. हा प्रकार जुना झाल्याने अनेक जण सतर्क झाले आहेत. त्यामुळे आता सायबर गुन्हेगारांनी अनेकांच्या भ्रमणध्वनीमध्ये लग्नपत्रिका ‘डॉट एपीके’ नावाने एक चित्रफीत पाठवण्यास सुरुवात केली आहे.
पाठवण्याऱ्यांचा क्रमांक अनोळखी असला तरीही अनेक जण कुणीतरी नातेवाईक असावा, असे गृहीत धरतात. तसेच काही जणांना उत्सुकता असते की कुण्यातरी नातेवाईकांकडे लग्न आहे. लग्नपत्रिकेच्या नावावर आलेली चित्रफीत ‘डाऊनलोड’ करतात. काही वेळताच भ्रमणध्वनी आपोआप बंद पडतो. पुन्हा सुरू केल्यानंतर काही ‘सेटिंग्स’ बदललेली दिसते.
सायबर गुन्हेगार त्या ‘एपीके फाईल’च्या माध्यमातून छुप्या पद्धतीने भ्रमणध्वनीवर नियंत्रण मिळवतात. त्यानंतर भ्रमणध्वनीमधील संदेश, क्रमांक, छायाचित्र, चित्रफिती, बँक खाते, एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड, पेमेंट ॲप यासोबतच ‘व्हॉट्सॲप’, फेसबुक आणि इंस्टाग्रामचे नियंत्रण सायबर गुन्हेगार स्वत:कडे करून घेतात.भ्रमणध्वनीमध्ये ठेवलेले आधारकार्ड, पॅन कार्ड व अन्य कागदपत्रांचाही गैरवापर करण्यात येतो.यामाध्यमातून नागरिकांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करण्यात येत आहे.