नागपूर: सत्तेच्या जोरावर भाजप विरोधकांवर दबाव आणून त्यांना ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स अशा यंत्रणाची भीती दाखवण्यात येते.
महायुतीकडे सत्ता आहे. त्यांच्याकडे प्रचंड काळापैसा आहे. हा लुटलेला पैसा आहे. त्यांच्याकडे पोलीस, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स अशा यंत्रणा आहेत. त्यामुळे ते महाविकास आघाडीतील आमदार, नेते आमच्या संपर्कात आहेत, अशा प्रकारचे दावे करू शकतात. या यंत्रणा जर आमच्याकडे असत्या, तर अख्खा भाजपा आम्ही १५ मिनिटांत रिकामा केला असता, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत एकनाथ शिंदे नाराज आहेत, यावरही संजय राऊत यांनी भाष्य केले.
एकनाथ शिंदे नाराज जरी असले, तरी त्यांना कोण विचारत आहे. एकनाथ शिंदे यांचा आनंद किंवा त्यांची नाराजी दिल्लीसाठी आता संपलेली आहे. हे सगळे कळसुत्री बाहुली आहेत. अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील हे आता गुलाम आहेत. गुलामांनी बलिदानाची तयारी ठेवली पाहिजे, ती यांच्याकडे नाही. ते डरपोक लोक आहेत, अशा शब्दात संजय राऊतांनी हल्लाबोल केला.