नागपूर : शहरात हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनासाठी आल्यानंतर सर्व आमदारांसाठी नागपूरच्या आमदार निवास येथे राहण्याची व्यवस्था करण्यात येते. मात्र येथे अपवादानेच काही आमदार थांबतात. इतर सर्व आमदार महागड्या हॉटेल्समध्ये मुक्कामाला असतात.
आता तर आमदारांसह त्यांचे पीए, कर्मचारी आणि काही कार्यकर्ते देखील महागड्या हॉटेल्समध्ये मुक्काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. नागपुरातील आमदार निवास भव्य आणि प्रशस्त अशी इमारत आहे. याठिकाणी कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिक आपले प्रश्न घेऊन आपल्या क्षेत्रातील आमदारांकडे येत असतात. मात्र आता पूर्वी सारखी संस्कृती राहिलीच नाही. आमदार निवास केवळ आमदारांचे कार्यकर्ते आणि त्यांच्या नातेवाईकांनी भरलेले दिसते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आपले प्रश्न घेऊन पंचतारिका हॉटेलमध्ये जाणार का? असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे.
हॉटेल मध्ये राहण्याचा खर्च सरकारच्या तिजोरीतून –
आमदार निवासात न थांबता हॉटेलमध्ये किंवा इतरत्र मुक्कामी असणाऱ्या आमदारांसह त्यांच्या पीए, कर्मचाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा राहण्याचा खाण्याचा खर्चही सरकारच्या तिजोरीतून होत असल्याची माहिती आहे.
अधिवेशनापूर्वी आमदार निवासाच्या सुशोभिकरणावर खर्च –
नागपुरात हिवाळी अधिवेशनापूर्वी आमदार निवासाच्या सुशोभिकरणावर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. परंतु विधीमंडळातील बहुसंख्य आमदारांनी आमदार निवासामध्ये न थांबता तारांकित हॉटेल किंवा शासकीय विश्रामगृहात मुक्कामाला पसंती दिली आहे. त्यामुळे आमदारांना निवासात थांबायचं नसेल तर अनावश्यक खर्च कशासाठी केला जातो? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागानं कोट्यवधी रुपये खर्च करून इमारतीची रंगरंगोटी केली आहे. याशिवाय भोजनगृहात आकर्षक सजावटीसह प्रत्येक खोलीत काही नवीन वस्तूही खरेदी करण्यात येतात. फर्निचरसह चादरी आणि सोफेही बदलले जातात. परंतु अशा सुसज्ज इमारतीत आमदार राहतच नसतील तर या खर्चाला काय अर्थ असा प्रश्न पडला आहे.