नागपूर : शहरातील एका घटनेमुळे पुन्हा महिला सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. मेडिकल चौक येथे असलेल्या विआर मॉलमधील पॅन्टलून स्टोरच्या ट्रायल रूममध्ये १६ वर्षाची मुलगी कपडे बदलत असताना अचानक स्टॅफमधील कर्मचाऱ्याने तिथे प्रवेश केल्यामुळे गोंधळ उडाला. मुलीने याचा विरोध केला असतानाचा कर्मचाऱ्याने तिच्यासोबत दुर्व्यवहार केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे मॉल परिसरात खळबळ उडाली होती.
या घटनेसंदर्भात मुलीने आपल्या कुटूंबियांना सांगितले. मुलीच्या वडिलांनी मॉलच्या पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांना या घटनेसंदर्भात जाब विचारला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत कोणतीही मदत केली नाही. शेवटी पीडित मुलीच्या वडिलांनी थेट इमामवाडा पोलिस स्टेशन गाठले.पोलिसांनी आरोपी सुनील राऊत याला ताब्यात घेतले.
दरम्यान आरोपी याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचारापासून मुलांचे संरक्षण कायदा (POCSO) व्यतिरिक्त लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच प्रकरणाच्या पुढील तपासाला पोलिसांनी सुरुवात केली आहे.
मॉल्समधील महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा उचलून धरू- डीसीपी रश्मिता राव
या प्रकरणी ‘नागपूर टुडे’ने डीसीपी रश्मिता राव यांच्याशी चर्चा केली. राव म्हणाल्या की आरोपी राऊतला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईचा प्रस्तावही तयार करण्यात आला आहे. आम्ही मॉल्समधील महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा उचलून धरणार आहोत.
मॉलमध्ये पर्याप्त संख्येत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले की नाही याचा तपास आम्ही करणार आहोत. महिलांच्या सेक्शनमध्ये मॉलमधील महिला कर्मचारी तैनात आहेत की हे देखील आम्ही सुनिश्चित करणार असल्याचे राव म्हणाल्या.