नागपूर:मराठी माणसावर हल्ला करणाऱ्यांवर महाराष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली.
कल्याणमधील हायफाय सोसायटीत झालेल्या मराठी कुटुंबावरील हल्ल्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची आज घोषणा केली पाहिजे, अशी मागणी करतानाच मराठी माणसावर हल्ला करणाऱ्या सोसायट्यांची ओसी रद्द करण्याचा कायदा आणा, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
मीडियाशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणावर संताप व्यक्त करत सरकारवर हल्लाबोल केला.
मुंबईत मराठी-अमराठी हे वाद कधी नव्हते. व्हेज-नॉनव्हेज हे कुठून आलं? यापूर्वी असं नव्हतं. आम्ही हिंदूधर्मीय आहोत. आम्ही मटणमच्छी खातो. इतके दिवस हा प्रकार नव्हता. आता हा प्रकार कुठून आला? आमची मागणी ही आहे की कालचा जो वाद झाला. राज्यात कोणी व्हेज सोसायटी करत असेल तर त्याची ओसी रद्द केली पाहिजे? मराठी माणसाला घर दिलं नाही तर ओसी अशा सोसायटीला ओसी देऊ नका. अशा हाउसिंग सोसायटीवर कारवाई झाली पाहिजे. मराठी माणसाला दाबण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र द्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.