नागपूर. केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या संकल्पेतून नागपूर शहरात लवकरच सातव्या खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन होणार आहे. या अनुषंगाने शनिवारी २१ डिसेंबर २०२४ रोजी खासदार क्रीडा महोत्सवाच्या कार्यालयाचे उद्घाटन पॅरा बॅडमिंटन विश्व चॅम्पियन मानसी जोशी यांच्या हस्ते होणार आहे.
शनिवारी (ता.२१) सायंकाळी ५.३० वाजता सीताबर्डी येथील ग्लोकल स्क्वेअर मॉलमधील कार्यालयाचे उद्घाटन होईल. उद्घाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून भारतीय जनता पार्टीचे नागपूर शहराध्यक्ष श्री. जितेंद्र (बंटी) कुकडे, आमदार श्री. कृष्णा खोपडे, आमदार श्री. मोहन मते, आमदार श्री. प्रवीण दटके यांची उपस्थिती असेल.
नागपूर शहर आणि संपूर्ण नागपूर जिल्ह्यासोबतच विदर्भातील खेळाडूंसाठी केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेले खासदार क्रीडा महोत्सव हे पर्वणी ठरत आहे. या क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
या महोत्सवाच्या सातव्या पर्वाला नव्या वर्षात सुरूवात होणार आहे. त्याअनुषंगाने खासदार क्रीडा महोत्सवाच्या कार्यालयाचा शुभारंभ करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला शहरातील खेळाडू, क्रीडाप्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे, असे आवाहन खासदार क्रीडा महोत्सव आयोजन समितीद्वारे करण्यात आले आहे.